अधिकारी करणार कन्यादान, तर प्रा.लहाने ‘ वरबापाच्या भूमिकेत ‘ ….
विधवा विवाह सोहळ्यासाठी सरसावले बुलढाणेकर !

अधिकारी करणार कन्यादान, तर प्रा.लहाने ‘ वरबापाच्या भूमिकेत ‘ ….
विधवा विवाह सोहळ्यासाठी सरसावले बुलढाणेकर !
बुलढाणा
विधवा व एकल महिलांचा पुनर्विवाह सोहळा 12 एप्रिल रोजी बुलढाणा येथे होत आहे. सामाजिक बदलाची नांदी ठरणारा हा नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.या सोहळ्याचे कन्यादान प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी करणार आहे तर प्रा. डी एस लहाने व मानस फाउंडेशन वरबापाच्या भूमिकेत राहणार आहे. सोहळ्याची तयारी पूर्णत्वास आली असून नियोजन बैठक आज शिवशाही पतसंस्था या ठिकाणी पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या शाहिनाताई पठाण होत्या. तर अन्न व औषध प्रशासन आयुक्त गजानन घीरके मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी एस लहाने, पत्रकार गणेश निकम, प्रज्ञाताई लांजेवार ,प्रा.ज्योती पाटील, प्रतिभा भुतेकर, सुरेखा सावळे , मनीषा वारे,अनिता कापरे,पत्रकार संदीप वानखेडे, संदीप जाधव ,गौरव देशमुख , गजानन मुळे ,किरण पाटील, पंजाबराव गवईआदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विविध समित्यांचे गठन यावेळी करण्यात आले. विधवा महिलांसाठी आयोजित हा कार्यक्रम आद्य स्रीवादी लेखिका ताराबाईंच्या कार्याचे स्मरण देणारा असून बुलढाण्याची भूमी महिला सक्षमीकरणास प्रोत्साहन देणारी असल्याचे प्रा.शाहीनाताई पठाण यावेळी म्हणाल्या. विवाह इच्छुक जोडप्यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर प्राध्यापक डी एस लहाने ,गजानन घीरके यांनीही विचार व्यक्त केले.
12 एप्रिल रोजी येथील सैनिक मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी दहा ते एक या कालावधीत विवाह सोहळा होत आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संसार बाटली ,विमा कवच, नवरदेव नवरीचा पोशाख, मंगळसूत्र व अन्य मदत केली जात आहे. यासाठी बुलढाण्यातील सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी व व्यापारी वर्ग पुढे आला आहे. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. बहुतेक अधिकाऱ्यांनी यासाठी वेळही दिला असून त्यांच्याच हस्ते जोडप्यांचे कन्यादान देखील होणार आहे. तर मानस फाउंडेशन,कार्यक्रमाचे नियोजन करणारे प्रा. डी एस लहाने हे तर वरबापाच्या भूमिकेत आहे. एक नव्हे दोन नावे तर तब्बल दहा दहा मुलींचे लग्न एकाच वेळी लावून त्यांनी पालकत्वाची अनोखी भूमिका यापूर्वीही पार पाडली आहे. यावर्षी देखील हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहे.
*विवाह इच्छुक जोडप्यांनी सहभागी व्हावे*
माणस फाउंडेशनच्या वतीने विधवा व एकल महिलांसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होऊ शकतात. त्यासाठी कोणताही खर्च आकारला जात नाही. सहभागी होणाऱ्या जोडप्यांना मानस फाउंडेशन कडून योग्य ती मदतही केली जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त जोडप्यांनी सहभागी व्हावे व काळानुरूप बदल स्वीकारावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या शाहीनाताई पठाण यांनी केले आहे.



