बातमी

आ. संजय गायकवाड यांचा सभागृहात सरकारच्या विकासकामांवर ठाम विश्वास

आ. संजय गायकवाड यांचा सभागृहात सरकारच्या विकासकामांवर ठाम विश्वास

मुंबई : “महायुती सरकार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या तत्वांवर चालणारे सरकार आहे. आम्ही सर्व समाजघटकांना सोबत घेत न्याय देण्याचे काम करत आहोत. विरोधकांनी कितीही अपप्रचार केला, तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार ठोस निर्णय घेत राहील,” असे ठाम मत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी सभागृहात व्यक्त केले.

आ. संजय गायकवाड यांनी सभागृहात विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला आणि समाजाच्या सर्व थरांतील लोकांसाठी सरकार काम करत आहे. विरोधकांकडून वारंवार निराधार आरोप केले जात असून, सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून, ती केवळ विकास पाहते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बुलढाणा घटनेबाबत बोलताना आ. संजय गायकवाड म्हणाले की, “पीडितेच्या वडिलांनी वारंवार अन्यायाविरोधात आवाज उठवला होता. मात्र, विरोधकांनी या प्रकरणाचा विपर्यास करून सरकारला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. आम्ही या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून योग्य न्याय दिला आहे.” तसेच, राज्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार उत्तर प्रदेशप्रमाणे कठोर कारवाई करत आहे. “बुलडोजर अॅक्शन” हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बुलढाणा नगरपालिकेने महाराष्ट्रात पहिल्यांदाच CBSE शाळा सुरू केल्या आहेत. हा शिक्षण पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, जिजाऊंच्या जन्मभूमीचा सन्मान राखण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण “जिजाऊनगर” करण्याची मागणीही त्यांनी केली.

जलसंधारणाच्या मुद्द्यावरही आ. संजय गायकवाड यांनी ठोस भूमिका घेतली. ते म्हणाले, “विदर्भातील सिंचन केवळ 6% असून, मोठे जलसंधारण प्रकल्प राबवण्याची गरज आहे. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा विस्तार करून वरच्या 6 तालुक्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.” तसेच, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत थकीत रकमेच्या त्वरित अंमलबजावणीची मागणीही त्यांनी केली.

महायुती सरकारच्या सरपंच मानधनवाढ, जलजीवन मिशन, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, शेतरस्ते विकास, कापूस आणि सोयाबीनच्या योग्य बाजारभावांसारख्या विविध योजना आणि निर्णयांवर आ. संजय गायकवाड यांनी भर दिला. विरोधकांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना ते म्हणाले, “महायुती सरकारच्या कामांवर जनतेचा विश्वास आहे. विरोधकांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी खोटे आरोप करण्याऐवजी महाराष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे.”

सभागृहात आ. संजय गायकवाड यांच्या या ठाम भूमिकेचे सदस्यांनी समर्थन केले. महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असून, विरोधकांचा अपप्रचार निष्फळ ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button