कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे – प्रा. नरेंद्र खेडेकर
विश्वासघाती सरकारला आंदोलनाचा वनवा भस्मसात करेल - जयश्रीताई शेळके

* कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे – प्रा. नरेंद्र खेडेकर
* विश्वासघाती सरकारला आंदोलनाचा वनवा भस्मसात करेल – जयश्रीताई शेळके
* शेतकऱ्यांच्या हक्काची कर्जमाफी मिळूनच राहणार – जालिंदर बुधवत


बुलढाणा :
राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज २ मे रोजी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चा ने जिल्हा मुख्यालय बुलढाणा अक्षरशः जाम होऊन गेले होते. निवडणूक पूर्व काळात दिलेला आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेने ( उबाठा )या प्रचंड धडक मोर्चातून महायुती सरकारला जाब विचारला. शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी घणाघाती हल्ला चढवत झोपेच सोंग घेतलेल्या महायुती सरकार ला जागा करण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा असल्याचे सांगितले. “देता की जाता की खाता लाथा” अशाप्रकारे या आंदोलनाची भविष्यात व्याप्ती वाढवावी लागणार असल्याचे सांगून हा वनवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभरात पेटेल आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असेही प्राध्यापक नरेंद्र खेडेकर म्हणाले.
जिजामाता प्रेक्षागार परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. संगम चौक, जयस्तंभ चौक, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन शिवसेना (उबाठा) शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना रीतसर सुपूर्त केले. तत्पूर्वी जिजामाता प्रेक्षागार येथे पार पडलेल्या सभेत नेत्यांच्या आक्रमक भाषणांनी जोश भरला. यावेळी संबोधित करताना नरेंद्र खेडेकर म्हणाले की, शेतकऱ्यांना निवडणुकीच्या वेळी वेगवेगळी आश्वासने दिली, मात्र त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. आम्ही शेतकऱ्यांनी काही चोरी केली नाही. अदानी, अंबानी यांचं हजारो कोटींचं कर्ज माफ होत मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे नाही का? असा सवाल नरेंद्र खेडेकर यांनी केला. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पिक विम्यापासून अपात्र ठरवण्यात आले. काही शेतकऱ्यांना २०० रुपये,१५० रुपये असा विमा मिळाला. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा या सरकारने चालवली असल्याचे नरेंद्र खेडेकर म्हणाले.
* विश्वासघाती सरकारला आंदोलनाचा वनवा भस्मसात करेल- जयश्रीताई शेळके
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणून महायुतीचे सरकार सत्तेत आले. मात्र तीन महिन्यांच्या आता त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिलेला शब्द पाळणे म्हणजे काय असते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. मात्र आताचे हे महायुतीचे सरकार अतिशय विश्र्वासघातकी आहे असा हल्लाबोल शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केला. कर्जबुडव्या मोठ्या कंपन्या आणि उद्योगपतींचे कर्ज सरकारने राईट ऑफ केले म्हणजे एक प्रकारे माफच केल. मात्र उन्हातानात परिश्रम करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. विदर्भ- मराठवाड्यात गतकाळात अडीच हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या सरकारला लाज वाटली पाहिजे. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आंदोलनाचा वणवा पेटवला आहे. या वणव्यात हे महायुती सरकार भस्मसात होईल असे जयश्रीताई शेळके म्हणाल्या.
* शेतकऱ्यांच्या हक्काची कर्ज माफी मिळूनच राहणार-जालिंदर बुधवत
शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. बेरोजगारी वाढली आहे. गावागावात प्यायला पाणी नाही. सरकारने जुमला करून, वेगवेगळी आश्वासने करून निवडणुका जिंकल्या. मात्र आश्वासनांची पूर्तता होत नाही. कर्जमाफीचे आश्वासन दिले मात्र आता त्यावरून सरकारने शब्द फिरवला आहे. शालेय विद्यार्थ्यांना वर्ष झालं तरी गणवेश मिळाला नाही. लोकांची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आहे. निर्दयी व खोटारड्या सरकारला भानावर आणण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्जमाफी मिळून घेतल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचेही बुधवत म्हणाले.
* महायुतीचे सरकार फसवे– आमदार सिद्धार्थ खरात
आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, आता शेतकरी जागा झालेला आहे. शिवसेना हा एकमेव पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. महायुतीतल्या एकतरी आमदाराने,नेत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे का?असा सवाल त्यांनी केला. खोटी आश्वासने देऊन महायुतीने सत्ता मिळवली, आता ते सत्तेचे लोणी खाण्यात व्यस्त असून महायुतीचे हे सरकार फसवे आहे असेही आ.खरात म्हणाले. नाफेड ची खरेदी केंद्र बंद आहेत. अजूनही सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आता झोपेच सोंग घेणाऱ्या सरकारच्या विरोधात शिवसेनेचे भगव वादळ पेटून उठले आहे. यावेळी दत्ता पाटील, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, डी. एस.लहाने यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे व तालुकाप्रमुख लखन गाडेकर यांनी केले.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, सह संपर्क प्रमुख दत्ता पाटील, महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ विजयाताई खडसन, जिल्हा संघटक प्रा. डी.एस.लहाने सर, गोपाल बछिरे, जिल्हा समन्वयक संदिप दादा शेळके, युवसेना जिल्हा प्रमुख नंदु कऱ्हाडे, शुभम पाटील, मआउप जिल्हा प्रमुख संजीवनी वाघ, उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, सुनील घाटे, बद्रि बोडखे, तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, विजय इंगळे, निंबाजी पांडव, किसन धोंडगे, गजानन वाघ, श्रीराम खेलदार, दिपक चांभारे, ईश्वर पांडव, प्रा सिद्धेश्वर आंधळे, मोहित राजपूत ,मोहम्मद सोफियान, अपंग सेलचे गणेश सोनुने, अशोक मामा गव्हाणे, माजी सभापती सुधाकर आघाव, शहर प्रमुख किशोर गारोळे, गोविंदराव झोरे, श्रीराम झोरे, डॉ अरुण पोफळे, संजय वडतकर, गजानन उबरहंडे, विजय इतवारे, सुनील गवते, संजय गवळी, बबन खरे, संजय शिंदे , राजू मुळे तसेच शिवसेना, युवसेना महिला आघाडी, किसान सेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.



