बातमी
जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन * पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल* स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. चिखली येथील महोत्सवात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यात स्थानिक कलाकारांना कला सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यपर्यंत पोहचविण्यासाठी पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.महासंस्कृती मेळाव्याच्या जिल्हास्तरीय महोत्सवासाठी स्वारस्य अभिव्यक्ती तत्वावर शासन मान्य संस्था, प्रायव्हेट, पब्लिक लिमिटेड कंपनी, मार्केंटींग, निमसरकारी ईव्हेंट कंपनी यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान स्थानिक व विविध जिल्हा पातळीवरील कलाकारांना संधी देऊन 5 दिवस सलग कार्यक्रम रोज संध्याकाळी 6 ते 10 वेळात होणार आहे. या कार्यक्रमात सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रमात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम, शिवचरीत्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेतील विविध प्रकारात पोवाडा, भारूड, गोंधळ, विविध भागातील तसेच स्थानिक दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचे कार्यक्रम, महाराष्ट्रातील विविध महोत्सव उदा. कोकणातील नमन व दशावतार, खानदेशातील वही गायन, विदर्भातील झाडीपट्टी, खडी गंमत इ. कवितांचे कार्यक्रम, व्याख्याने, देश भक्ती गीतांचा कार्यक्रम, जिल्ह्यातील स्थानिक सण, उत्सव, कार्यक्रमांचा समावेश असेल.
प्रदर्शन दालनात छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रम, प्रदर्शन भरविणे, वस्त्र संस्कृति दालन, हस्तकला वस्तु दालन, बचत गटांचे उत्पादक दालन, पर्यटन विषयक दालन तसेच इतर कार्यक्रमात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारी स्पर्धा, मर्दानी खेळ, शिवकालीन लोककला, लुप्त होत चाललेल्या खेळांचा उपक्रम, जिल्हा समितीने ठरविलेले उपक्रम, कार्यक्रम आदीचा समावेश असावा.
सांस्कृतिक कला प्रदर्शन व उद्घाटन सोहळा तसेच 5 दिवसाचे कलाकारांचे योग्य मानधन निवास, येण्या-जाण्याची व्यवस्था आदी खर्चाचा यात समावेश असेल.
.विविध कार्यक्रमासाठी 5 दिवस सलग स्टेज 40 फुट X 60 फुट तसेच 5 हजाराहून अधिक लोक बसण्याची व्यवस्था, लाईटिंग, एलईडी स्टेज, जनरेटर, साईड मास्किंग, वॉलेंटरीव्दारे व्यवस्थापन, निमंत्रण पत्रिका वाटप, कोरीयोग्राफर, प्रोग्रॉम डॉयरेक्टर, व्हीव्हीआयपी मॅनेजमेंट व तसेच आवश्यक असलेले पुरक उपकरणे, प्रचार-प्रसार करण्यासाठी 10 ते 15 दिवस अगोदर कार्यक्रमासाठी लागणारा इतर किरकोळ गोष्टीचा पुर्ण खर्च हँडबिल, होर्डिंग, वृत्तपत्रामध्ये शासकीय दराने जाहिरात, एलईडी वाहन खर्च व इतर खर्च, सिक्युरिटी, विविध परवानग्यांसाठी लागणारा खर्चाचा समावेश राहणार आहे.
सदर प्रस्तावासाठी शासन मान्य संस्था, प्रायव्हेट, पब्लिक लिमिटेड कंपनी, मार्केंटिंग, निमसरकारी ईव्हेंट कंपनी, 10 किंवा अधिक वर्षाचा अनुभव तसेच कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत असावे. तसेच देशामध्ये 3 किंवा अधिक राज्य सरकार, निमसरकारी संस्था, कॉपेरेशन लिमिटेड, पीएसयूसोबत ईव्हेंट करण्याचा अनुभव असावा.
तसेच 5 हजारपेक्षा अधिक प्रेक्षकांकरीता सामुहिक कार्यक्रमांचे व्यवस्थापनाचा व दृक-श्राव्य प्रचार-प्रसार प्रसिध्दीच्या अनुभव आणि मागील 3 वर्षात प्रतिवर्ष किमान आर्थिक उलाढाल 3 कोटीपेक्षा अधिक असणाऱ्या इच्छुक संस्थानी आपला प्रस्ताव 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे व्यक्तीश: स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव सादर करावे. अधिक माहिती करिता स्थानिक निधी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत येऊन संपर्क करावा. 5 दिवसीय जिल्हास्तरीय महासंस्कृती मेळावा हा बुलडाणा, चिखली येथे दि. 25 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.



