बातमी

बुलढाण्यात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

*बुलढाण्यात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा*

बुलढाणा, दि.२२ : जिल्हा पुरवठा कार्यालय आणि तहसील कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार व्ही. एस. कुमरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्राहक दिनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “ग्राहक हा प्रत्येक अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचे हक्क ओळखून योग्य ठिकाणी त्याचा वापर करावा. फसवणूक होऊ नये म्हणून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.”

या कार्यक्रमात ग्राहक हक्क आणि संरक्षण याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात अ. भा. ग्रा. पंचायतचे अध्यक्ष नगीनदास बैरागी आणि सचिव श्रीकांत अंधारे यांनी ग्राहक दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. यासोबतच ग्राहक हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांना त्यांच्या हक्कांची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाच्या सदस्य ॲड. रत्नमाला गवई यांनी ग्राहक संरक्षण कायद्यांबद्दल माहिती देऊन ग्राहकांनी त्यांच्या हक्कांसाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात नायब तहसीलदार शशिकांत वाघ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात निरीक्षण अधिकारी नीलिमा उरकुडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी ग्राहक हक्कांचे महत्त्व आणि सध्याच्या काळात ग्राहकांनी त्यांच्या अधिकारांची जाणीव ठेवण्याची गरज स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गायत्री सावजी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button