आंदोलन बातमी
भीम आर्मी चा बुलढाण्यात जन आक्रोश मोर्चा
त्याने बूट मारला की आम्ही बुलेट मारू.. भाई सतीश पवार

बुलढाणा
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोरने बुट मारला. दुसरा वकील अनिल मिश्रा संविधान संपविण्याचा आणि संविधान निर्माते बाबासाहेबांचे विचार संपविण्याची भाषा करतो. आता हा अपमान सहन केला जाणार नाही. त्याने बूट मारला, आम्ही बुलेट मारू, गोली का जबाब गोलियोसे दिया जाएगा, असा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी आज 17 ऑक्टोबर रोजी जनआक्रोश मोर्चा प्रसंगी दिला.
सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकील राकेश किशोर आणि अनिल मिश्रा यांच्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, त्यांची सनद रद्द करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी १७ ऑक्टोबर २०२५ ला भीम आर्मीच्या वतीने सतीश पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
तत्पूर्वी जिजामाता प्रेक्षागार मैदानावर झालेल्या सभेला संबोधित करताना येथून पुढे होणारे अन्याय, अत्याचार सहन केले जाणार नाही, असा इशारा सरकारला देण्यात आला.
सुरुवातीला संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. सुरेश जाधव, अनंता मिसाळ, कैलास खिल्लारे, शैलेश वाकोडे, प्रकाश धुंदळे, संतोष वानखडे यांनी मोर्चाला आपले सडेतोड विचार मांडले. मल्हारी गवई यांनी मनुवादी विचारसरणीवर आधारित गीत सादर केले. दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाइन, कारंजा चौक या मार्गाने घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सरकार आणि मनुवादी धोरणा राबविणाऱ्यांवर चौफेर टिका करीत सतीश पवार म्हणाले, दोन्ही वकील मनोविकृत आहेत. यापूर्वी सर्वोच्च पदावर बसलेले हिदायतऊल्ला खान यांच्यावरही हल्ला झाला होता, याचाही दाखला त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडित वर्गाला जगण्याचा अधिकार दिला. आजही बुरसटलेले विचार कायम आहेत. त्यातून मागासवर्गीयांवर अन्याय, अत्याचार केला जात आहेत. यापुढे आम्ही शांत बसणार नाही. आमच्यावरील अन्याय, अत्याचार खपवून न घेता प्रतिकार करण्याची ताकद आमच्यात आहे, हे देखील सतीश पवार यांनी ठणकावून सांगितले.
* प्रतीकात्मक देखाव्यातून मनुवादी विचारसरणीवर प्रहार
गळ्यात मडके, कंबरेला झाडू बांधलेल्या पाच व्यक्तींचा प्रतीकात्मक देखावा सादर करण्यात आला. या जिवंत देखाव्यातून जसा अत्याचार पूर्वी व्हायचा, तीच मागील परिस्थिती आणण्याचा प्रयत्न सध्या मनुवादी विचारसरणीतून आणल्या जाणार असल्याचे वास्तव दर्शविण्यात आले. तसेच या मोर्चात दंडाला काळ्या फिती बांधून सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

* गुन्हे दाखल न केल्यास पोलिस ठाण्याला वेढा घालू
आम्ही जातीवाद मानत नाही, सामनता मानतो. मिश्रा आणि किशोर या वकिलांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तीन दिवसांत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नाहीतर हजारोंच्या संख्येने पोलिस ठाण्याला वेढा घालू, असा इशाराही सतीश पवार यांनी दिला.


