बातमी

मेहकरमध्ये संततधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची आमदार सिद्धार्थ खरात यांनी भर पावसात केली पाहणी

*मेहकरमध्ये संततधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची आमदार सिद्धार्थ खरात यांनी भर पावसात केली पाहणी

मेहकर
कालपासून मेहकर व लोणार तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मेहकर शहरात नाल्यांची साफसफाई न झाल्याने रस्त्यांवर व घरांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज सकाळपासून शहराच्या विविध भागांमध्ये भर पावसात पाहणी केली. मुख्य रस्ते, बाजारपेठा, गल्लीबोळ, इमामवाडा चौक, रामनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, माळीपुरा, सावजी गल्ली या भागांतील पाणी साचलेले रस्ते, तुडुंब भरलेल्या नाल्या व नागरिकांची हालअपेष्टा त्यांनी जवळून पाहिल्या.

मेहकर शहरातील एकमेव मुख्य रस्त्यावर दवाखाने, शाळा, मंदिर व कापड दुकाने असल्याने नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे घरगुती वस्तूंचे नुकसान झाले असून, आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. यासोबतच दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छतेचं वातावरण पसरलं आहे.

संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना तत्काळ बोलावून घेतले व नगरपालिकेला तातडीने पावसाचे साचलेले पाणी काढण्याचे तसेच गटारींची सफाई करण्याचे निर्देश दिले. त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे.

या पाहणी दौऱ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किशोर गारोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निसारभाई अन्सारी, काँग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष शैलेश बावस्कर,ॲड. संदीप गवई, योगेश कंकाळ, सद्दाम कुरेशी, निलेश बावस्कर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असून, यामधून प्रशासनाने योग्य धडा घ्यावा आणि तातडीने उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button