बातमी

मेहकर व लोणार तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मदतीसाठी शिवसेना आमदारांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ५०० कोटींच्या विशेष पॅकेजची मागणी*

*मेहकर व लोणार तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मदतीसाठी शिवसेना आमदारांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ५०० कोटींच्या विशेष पॅकेजची मागणी*

 

मेहकर दि १ मेहकर व लोणार तालुक्यांमध्ये दिनांक २५ व २६ जून २०२५ रोजी झालेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुके अक्षरशः जलमय झाले असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ५०० ते ७०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.#

निवेदनात आ. सिद्धार्थ खरात यांनी म्हटले आहे की, या दोन्ही तालुक्यांमध्ये सरासरी २१२ मिमी पावसाची नोंद झाली असून, मेहकर तालुक्यातील काही भागांमध्ये हा पाऊस २०० ते २२७ मिमी दरम्यान कोसळला. शासनाच्या नियमांनुसार ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाला नैसर्गिक आपत्ती मानून मदत दिली जाते, त्यामुळे या भागात झालेला पाऊस त्याच्या अनेक पट अधिक असल्यामुळे परिस्थिती पूर्णतः बिघडली आहे.

या पावसामुळे नद्या व नाले भरून वाहत होते, काहींनी आपला प्रवाह बदलल्याने शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर माती वाहून गेली असून काही जमिनींवर मोठे टोळ साचल्यामुळे त्या कायमस्वरूपी नापीक झाल्या आहेत. काही भागात तर शेतांमध्ये जलाशय निर्माण झाल्यासारखे चित्र आहे.

शेतकऱ्यांनी केलेली पेरणी पूर्णतः वाया गेली असून, गाळ साचल्यामुळे पुढील शेतीसाठीही अडचण निर्माण झाली आहे. शेतांमधील बोअरवेल, विहिरी, सोलर पंप, स्प्रिंकलर सेट, केबल्स आणि पाइपलाइन यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक जनावरे वाहून गेली असून घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे धान्य, वस्त्र, वस्तू, आणि इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

याचबरोबर या दोन्ही तालुक्यांमध्ये आधीच मर्यादित असलेल्या पायाभूत सुविधांनाही जबरदस्त तडाखा बसला आहे. अनेक शेत रस्ते, गाव रस्ते, महावितरणचे विद्युत पोल, केबल्स, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे मार्ग, एमएसआरडीसीचे महामार्ग, जलसंधारण विभागाच्या पाझर तलाव व कालवे, समृद्धी महामार्ग, शेततळी आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून मी तात्काळ या भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली असून, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांना पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या ३० मे २०२५ च्या आदेशानुसार एसडीआरएफ व एनडीआरएफ अंतर्गत नुकसान भरपाई देण्याच्या तपासण्या सुरू आहेत.

परंतु, या आपत्तीत झालेले नुकसान हे केवळ नियमित मदतीत बसणारे नसून, यासाठी अतिरिक्त विशेष पॅकेजची गरज आहे. शासन निर्णयानुसार जर नुकसान जास्त असेल तर त्या त्या विभागांनी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून मदत व पुनर्वसन विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळासमोर सादर करता येतात, ही तरतूद लक्षात घेऊन तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

आमदारांच्या म्हणण्यानुसार, “ही केवळ अतिवृष्टी नसून खरीखुरी ढगफुटी होती. या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झाले असून गावांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान कोलमडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि किमान ५०० ते ७०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज तात्काळ जाहीर करावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.”

या निवेदनाची शासन स्तरावर दखल घेतली जावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा, ही संबंधित भागातील जनतेची अपेक्षा आहे.निवेदनाची प्रत पालकमंत्री मकरंद पाटील,बुलढाणा यांना सुद्धा भेटून देण्यात आली आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button