*’ लोकमंचचे ‘ पहिले मानपत्र देऊन गणेश निकम केळवदकर यांचा गौरव!*

*’ लोकमंचचे ‘ पहिले मानपत्र देऊन गणेश निकम केळवदकर यांचा गौरव!*
*बुलढाणा:*
*बुलढाणा शहराला वेगळा विचार द्यावा या उद्देशाने सांस्कृतिक, शैक्षणिक, सामजिक चळवळीत सक्रिय समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘ लोकमंच बुलढाणा’ विचारमंचच्या वतीने ४ जुलै रोजी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिंचोले हॉस्पिटलच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी लोकमंचचे पहिले मानपत्र देऊन दीर्घकाळ सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल पत्रकार गणेश निकम केळवदकर यांचा गौरव करण्यात आला.*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंच बुलढाणा चे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले होते तर मंचावर कर्नल सुहास जतकर, लोकमंचचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील सपकाळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, प्राचार्य शाहिनाताई पठाण, साहित्यिक सुरेश साबळे, प्रा.विजय घ्याळ,साहित्यिक विजयाताई काकडे, शिवसेना शिंदे गटाचे नेते गणेश सिंग राजपूत , डॉक्टर पुरुषोत्तम देवकर,सुजित देशमुख, प्रा. विष्णू ऊबाळे ,पंजाबराव गायकवाड ,बबन नाना ,पत्रकार सोहम घाडगे, कैलास राऊत,संदीप वानखेडे, राम हिंगे,शोकत शहा, रहमत अली, शेख इद्रीस, गजानन जाधव,शाहीर बावस्कर ,डॉक्टर किंनगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.*
*निष्ठा आणि तत्वांशी तडजोड करत चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या प्रवासाची दिशा बदलली. पैसा, सत्तेच्या प्रलोभनांनी विचारांना मूठमाती देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र गत २५ वर्षांपासून शिव- फुले – शाहू- आंबेडकर विचारांना अधिष्ठान मानून गणेश निकम केळवदकर हे चळवळी सोबतच सामाजिक,पत्रकारिता, साहित्य, क्षेत्रात कायम कार्यरत आहे. यावेळी बोलताना डॉक्टर शोन चिंचोले म्हणाले,शिवजयंती आयोजनाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलू शकलो यामध्ये गणेश निकम यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले.त्यांनी नेहमीच पाठबळ देत नवनवीन कल्पना सुचवल्या. अशा सहकार्यामुळे शिवजयंती लोकोत्सव झाली याचे आत्मिक समाधान आहे असे सांगितले. साहित्यिक सुरेश साबळे यांनी गणेश निकम यांच्या केळवद गावातील सुरुवातीच्या प्रवासापासून ते आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. पत्रकार राजेंद्र काळे यांनी जुने सहकारी गणेश निकम यांचा कार्यगौरव पाहून मनस्वी आनंद झाल्याचे सांगितले. तसेच जुन्या आठवणी सांगतांना ते म्हणाले की, निकम असतांना आमचे कार्यालय वैचारिक चळवळीचे केंद्र होते. जिल्ह्यातुन वेगवेगळ्या चळवळीचे मान्यवर त्यांना भेटायला येत. प्रा. सुनील सपकाळ म्हणाले की, सामजिक चळवळीत झोकून काम करणाऱ्या मित्राचा आपणास अभिमान आहे. सामाजिक चळवळीला वेळ देता येत नाही म्हणून चांगल्या पगाराची नोकरी सोडणारे गणेश निकम अजब व्यक्तिमत्व असल्याचे पत्रकार संदीप वानखेडे म्हणाले. पत्रकार कैलास राऊत यांनी मित्रांच्या पाठीशी खंबीर उभा राहणारा मित्र असा उल्लेख केला. या कार्यक्रमाचे बहारदार संचालन पत्रकार राम हिंगे यांनी केले. आभार प्रदर्शन सुनील सपकाळ यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्राध्यापक विजय घ्याळ यांनी मानपत्राचे वाचन केले.*
*…बॉक्स…*
*ते तर सुपरहिट चित्रपट देणारे डायरेक्टर- रणजित राजपूत*
*सातत्याने नवनवीन सामाजिक उपक्रम राबवणे आणि यशस्वी करणे साहित्यिक गणेश निकम यांचा स्वभाव आहे. त्यासाठी ते जीवतोड मेहनत घेतात. मात्र हे कार्य करत असतांना अजिबात श्रेय घेत नाही हे विशेष. नागराज मंजुळे जसे नवीन हिरो घेऊनही चित्रपट सुपरहिट करतात. सामाजिक क्षेत्रात तसेच कार्य गणेश निकम करीत आहेत. अर्थात यामध्ये त्यांचा कोणताच स्वार्थ नसतो. केवळ सामाजिक चळवळ जिवंत राहिली पाहिजे याकरिता त्यांचा खटाटोप असतो असे सांगून पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सिंग राजपूत यांनी कार्य आढावा घेतला.*