विदर्भातील पहिले १००% स्मार्ट मीटर झालेले शाखा कार्यालय
दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८० पैसे सवलतीचा मिळणार लाभ

*विदर्भातील पहिले १००% स्मार्ट मीटर झालेले शाखा कार्यालय*
*दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८० पैसे सवलतीचा मिळणार लाभ*
*बुलडाणा, दि. २७ मार्च २०२६ :*
महावितरणच्या खामगाव विभागाअंतर्गत येणारे पिंपळगाव राजा २,हे शाखा कार्यालय १०० टक्के स्मार्ट (टिओडी) मीटर बसविण्यात आलेले विदर्भातील पहिले शाखा कार्यालय ठरले आहे. मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते शेवटचे स्मार्ट मीटर बसवून या वितरण केंद्राचे शंभर टक्के स्मार्ट मीटरीकरण पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली.
स्मार्ट मोबाईल आणि स्मार्ट टीव्ही सारखेच स्मार्ट मीटर ही सध्याच्या काळाची गरज असून त्याद्वारे ग्राहकांना अधिक पारदर्शक आणि अचूक सेवा मिळणार असल्याचे मुख्य अभियंता नाईक यांनी यावेळी सांगितले.
स्मार्ट मीटरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, मीटरचे वाचन स्वयंचलित पद्धतीने होत असल्यामुळे सरासरी बिल, मीटर वाचन न झाल्याच्या तक्रारी यापुढे राहणार नाहीत. तसेच ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासाला मोबाईलवर पाहता येणार असल्याने वीज वापरावर नियंत्रण ठेवणे सुलभ होणार आहे.
महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट (टिओडी) मीटरच्या माध्यमातून दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या वीज दरानुसार ही सवलत १ जुलै २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. टिओडी मीटरद्वारे दिवसा आणि रात्रीच्या वीज वापराची स्वतंत्र नोंद ठेवली जाते. त्यामुळे स्मार्ट मीटर नसल्यास ग्राहकांना दिवसा वीज वापरावर मिळणाऱ्या सवलतीचा लाभ मिळू शकत नाही.
खामगाव विभागातील पिंपळगाव राजा २ वितरण केंद्र येथे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांची संख्या ४ हजार २६३ असून या सर्व वीज ग्राहकांकडे स्मार्ट टिओडी मीटर लावण्यात आले आहे. मीटर लावण्याची प्रक्रीया ऑक्टोबर महिन्यापासून टप्या -टप्याने सुरू होती. परंतू या सहा महिन्यात या फिडरच्या इनपूट मध्ये ३३ टक्यांनी घट झाली आहे. तसेच बिलींगची कार्यक्षमता ८४.४५ टक्क्यावरून ९५ .४ टक्के झाली असून वीज बिलांशी संबंधित तक्रारीही शुन्य झाल्याने वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.
अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अभियंता विरेंद्र जसमातिया, उपकार्यकारी अभियंता श्री. हिराळकर आणि कनिष्ठ अभियंता श्री. राजपूत व वितरण केंद्रातील तांत्रिक कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पुढाकार घेऊन स्मार्ट मीटर बाबत वीज ग्राहकांच्या शंका – कुशंकेचे निराकरण करत त्यांना स्मार्ट मीटरचे फायदे सांगून मनपरिवर्तन घडवून आणण्याच्या प्रक्रीयेत मोलाची भूमिका बजावली. याबद्दल मुख्य अभियंता यांनी सर्वांचे कौतूक करत अभिनंदन केले.



