विशेष बातमी
विधवा मुक्तीचा हुंकार ठरली विधवा परिषद * विधवांनो रडत बसल्यापेक्षा लढायला शिका – पुष्पलता भोरे

विधवा मुक्तीचा हुंकार ठरली विधवा परिषद
* विधवांनो रडत बसल्यापेक्षा लढायला शिका – पुष्पलता भोरे
मोताळा
एक काळ होता जेव्हा विधवांच जगनचं मान्य नव्हतं.. पती निधनानंतर तिला करंटी, पांढऱ्या पायाची म्हटले जायच.. अनेक बंधने, आर्थिक अडकाठी यामुळे तिच्या वाटा थांबल्या होत्या. मात्र आता तुम्ही संघर्ष करू शकता. अनेक कायदे महिलांना बळ देत आले आहे. या योजनांची माहिती घ्या,संघर्ष करा, रडू नका तर लढायला शिका असे प्रतिपादन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या शासनाच्या (यशदा संस्थेच्या) प्रशिक्षक, पुण्याच्या पुस्पलता भोरे यांनी केले. तर पती एकदाच मरतो मात्र त्याच्या पक्षात पत्नीला तर आयुष्यभर अडचणींचा सामना करीत मरावे लागते. यासाठी विधवा महिलांना बळ देऊन त्यांना सन्मानाने उभे करणारी विधवा परिषद असल्याचे प्रा. डी. एस. लहाने म्हणाले.
मोताळा येथील समर्थ केंद्रामध्ये आज 30 मे 2024 रोजी विधवा परिषद पार पडली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी चित्रपट निर्माते हरीश इथापे हे होते. तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून यशदाच्या प्रशिक्षक पुष्पलता भोरे उपस्थित होत्या. यावेळी आयोजक प्रा. डी. एस. लहाणे, प्रा.शाहीनाताई पठाण, पत्रकार रणजीत राजपूत, गणेश निकम, दीपक मोरे, संदीप वानखेडे, शौकत शाह ,ज्योती पाटील, सुरेखा सावळे, अनिता कापरे, प्रतिभा भुतेकर,स्वाती सावजी, गजानन मुळे, अश्विनी सोनवणे, सरपंच संघटनेचे अनिल पाटील,अक्षय पाटील, संदीप जाधव, गौरव देशमुख पंजाबराव गवई ,दिनकर पांडे, किरण पाटील,आदींची उपस्थिती होती.
विधवा महिलांचे पुनर्विवाह त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व त्यांच्या जीवनामध्ये उजेड पेरण्यासाठी प्रा. लहाने यांनी प्रयत्न चालविले आहे. मानस फाउंडेशन व शिवसाई परिवाराच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यामध्ये विधवा परिषदांचे आयोजन केले जात आहे. मोताळा येथे पार पडलेली ही चौथी परिषद होती.
यासाठी परिसरातील महिलांची प्रचंड मोठी उपस्थिती लाभली. अनेक महिलांनी आपल्या व्यथा, वेदना परिषदेमध्ये बोलून दाखवल्या. तर वय वर्ष 75 पासून तरुण लग्नाळू मुलापर्यंत सर्वांनीच विधवा विवाह सोहळ्यामध्ये उपस्थिती लावून आपल्या अनुरूप जोडीदाराचा शोध घेतला. प्रास्ताविकात प्राध्यापक डी.एस. लहाने यांनी आयोजना मागची भूमिका विशद केली. मुलांवर सगळ्यात जास्त प्रेम करणारी आई असते. आई मुलाला लहानचे मोठे करते, त्याला पाहिजे ते बळ देते, मात्र जेव्हा मुलाचे लग्न करण्याचा प्रसंग येतो तेव्हा धार्मिक कार्यातून तिला बाजूला केले जाते. विधवा महिलांना कार्यामध्ये सहभागी करून घेऊ नये असे कुठल्याही संतांनी सांगितलेले नाही. कोणीतरी नाव ठेवतो म्हणून अशा अनिष्ट प्रथा सुरू असून या अनिष्ट प्रथा परंपरांच्या विरोधात ताठ मानेने उभे राहण्याचे बळ आजची विधवा परिषद देत असल्याचे प्राध्यापक लहाने म्हणाले. कार्यक्रमाचे बहारदार संचलन पत्रकार रंजितसिंग राजपूत यांनी केले.
* सत्कार समारंभही आगळावेगळा :
पतीच्या निधनानंतर सौंदर्य लेणे न काढता पूर्वीप्रमाणेच आपला जीवनक्रम सुरू ठेवणाऱ्या छाया कऱ्हाळे या धाडसी महिलेचा यावेळी मान्यवरांनी सत्कार केला.
मोताळा येथील सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील, अस्विनी सोनोने यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
* सौंदर्य आणि स्वातंत्र्यासह जगायला शिका – इतापे
जीवनातील सौंदर्य कायम ठेवले तर गोडवा वाढतो.पतीच्या निधनानंतर आपण आपले सौंदर्य आणि स्वातंत्र्यासह जगले तर सकारात्मक दृष्टी विकसित होईल. महिला बोलत नाही, मनातल्या मनात कुढत राहतात. ज्या महिला बोलतात त्यांच्या समस्या सुटतात म्हणून आपण बोलायला शिकले पाहिजे. निर्भयतेने समस्या सोडवण्यासाठी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन चित्रपट निर्माते व नाम फाउंडेशनचे संस्थापक सदस्य हरीष इतापे यांनी यावेळी केले.
* विविध ठराव पारित :
विधवा परिषदेतील महत्त्वाचा भाग म्हणजे ठरावांचे वाचन. विधवा विवाहाचा उद्देश व परिषदेच्या कार्यची माहिती देऊन पत्रकार गणेश निकम यांनी ठरावांचे वाचन केले.त्याला उपस्थितांनी हात उंचावून दाद दिली.असे अनेक ठराव पारीत करण्यात आले.एखाद्या महिलेच्या पती निधनानंतर समाजाने तिला तिच्या इच्छेनुसार सौंदर्य लेण्यासह स्वीकारावे, तद्वतच प्रत्येक शुभकार्यात, धार्मिक कार्यात सन्मान मिळावा असा ठराव परिषदेत मांडण्यात आला असता उपस्थित महिलांनी तो प्रतिसाद देऊन मंजूर केला. सूचक प्रा. शहाणाताई पठाण, सुरेखा सावळे होत्या तर अनुमोदन प्रतिभा भुतेकर, ज्योती पाटील, अनिता कापरे यांनी दिले.



