बातमी

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी  * दोन दुचाकी चोरटे अटक ; साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त 

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी 
  1. * दोन दुचाकी चोरटे अटक ; साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त 
बुलडाणा 
       जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वेगवेगळ्या पथकाची नेमणूक केली आहे.
      या पथकांची कारवाईची छाप जिल्ह्यात, राज्यातच नव्हेतर परप्रांतातही सोडणाऱ्या बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा धडाकेबाज कामगिरी केली. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात या या पथकाला दोन दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून आठ दुचाकी, एक स्कुटर हस्तगत करण्यात येवून  ३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
       गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दित दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दित घडलेल्या गुन्ह्याची उकल करुन, आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी त्यांच्या नेतृत्वात येत असलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करुन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्ह्यांची उकल, आरोपींचा शोध व मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
 
       पथकाने गुप्त खबऱ्यांकडून माहिती काढून तसेच सायबर पोलीस स्टेशनच्या तांत्रिक विश्लेषखांच्या मदतीने खामगाव शहर पोलिसांत १ ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या जगन्नाथ अंभारे (रा.एकलारा ता. चिखली) यांची दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात नांदुरा पोलीस स्टेशन हद्दित येणाऱ्या खैवाळी येथून आरोपी ईमरान शहा दिलबर शहा (वय २६ वर्षे) च्या मुसक्या आवळल्या. त्याची कसुन चौकशी केली असता, त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली देत होंडा शाईन कंपीच्या ४, एचएफ डिलक्स कंपनीच्या २, स्प्लेंडर प्लस कंपनीची १, पॅशन प्रो कंपनीची १, असे ३ लाख २० हजार रुपये किंतीच्या ८ मोटारसायकल पोलिसांच्या स्वाधीन केल्या. तर २० जुलै रोजी मलकापूर शहर पोलिसांत दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात योगेश वानखेड (रा. मलकापूर) याला बेड्या ठोकल्या. त्यानेही केलेल्या गुन्ह्यांची कबुली देत चोरलेली दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यामुळे पाच गुन्ह्यांची यशस्वी उकल  करण्यात स्थानिक गुन्हे शोखेच्या पथकाला यश आले. पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सपोनि रुपेश शक्करगे, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम आघाव, गणेश पाटील, जयंत बोचे, गणेश शेळके, विलास भोसले यांनी ही कामगिरी बजावली.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button