*गुटखा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई*
- बुलडाणा, दि. 28 (जिमाका):नांदुरा येथे जळगाव जमोद रोडवरील विशाल जैन यांच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी सोळंके व गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी संदिप सुर्यवंशी, अजाबराव घेवंदे, नमुना सहायक आशिष देशमुख यांच्या पथकाने छापा मारुन 1 लक्ष 62 हजार 800 रुपये किंमतीचा पानमसाला व सुंगधीत तंबाखूचा साठा जप्त केला.
राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू, सुपारी व तत्सम तंबाखुजन्य पदार्थांविरुद्ध प्रतिबंध घालण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा अत्राम तसेच अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत अन्नपदार्थ विक्रीविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम 188,273 व 328 तसेच अन्न सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम 59 नुसार आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या प्रकरणीमध्ये दसरखेड, टोलनाका, मलकापूर, गाडी क्र. एमएच 21, बीएच 15 गाडीची तापडीया रा. रिसोड, जि. वाशिम या दोषीविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन, दसरखेड, येथे भा.दं.वि. कलम 188, 273 व 328, अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम 59 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही कारवाईत अमरावती विभागाचे सह आयुक्त (अन्न) ग.सु. परळीकर व सहायक आयुक्त स.द. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
*****