*✍️गणेश निकम केळवदकर*
*सत्यशोधक समाजाचा ‘ब्रॅन्ड अँम्बेसिडर’*
*प्रभोदनकार ठाकरे यांचा आज ५० वा स्मृतिदिन आहे. प्रबोधनकार आज देहरूपी नसले तरी त्यांनी निर्माण केलेली वैचारीक ग्रंथ संपदा आजही पुरोगामी, ब्राम्हणेत्तर चळवळीसाठी ‘ ‘ऊर्जा ‘” ‘दारुगोळा’ आहे. प्रबोधनकारांचं वाक्य अन् वाक्य बुडाला आग लावणारे आहे. खोटारडे इतिहासकार आणि खोट्या इतिहासाचा बुरखा प्रबोधनकारांनी टरटरा फाडला व अशा लोकांना प्रबोधनी सोटा देखील हाणला. त्यामुळे प्रबोधनकार ठाकरे हे नाव जरी उच्चारले तरी तेव्हा पत्रपंडितांची गाळण उडत होती. महाराष्ट्राला वैचारिक दिशा देणाऱ्या लोकांमध्ये प्रबोधन मासिकाचे संपादक के.सी. ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे हे नाव बरेच वर आहे.*
*राजर्षी शाहू महाराजांनी ब्राम्हणेत्तर चळवळीला बळ दिले तेव्हा महाराजांवर पुण्याच्या पेठेतील लोक लेखणीची तलवार घेऊन तुटून पडले. मात्र महाराजांच्या सोबत खंबीरपणो उभे होते ते प्रबोधनकार ठाकरे. त्यांच्या प्रबोधनी सोटयाचा प्रसाद खाणारे पुन्हा त्यांच्या वाटयाला जात नसत. प्रबोधनकारांनी बरीच मोठी ग्रंथ संपदा निर्माण केली. लिखाण करीत असतांना सामाजिक सुधारणा हाच त्यांचा पाया राहिला. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते, ब्राम्हणेत्तर चळवळीतील महत्वाचे नाव, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नितांत आदर हे त्यांचे वैशिष्ठ होते. भारतीय इतिहास जातीय उतरंडीतून लिहिल्या गेला. सदाशिव पेठी लेखकांनी केलेली मांडणी प्रबोधनकारांना खटकणारी ठरली. अशा लेखकांचा ते यथेच्च समाचार घेत असत. समाजातील सर्व विकारांचे मर्म कर्मकांडात आहे. अशी ठाम धारणा प्रबोधनकारांची होती. म्हणूनच ते ब्राम्हणशाहीवर तुटून पडत. त्यांचे संपूर्ण लेखन बहुजन समाजाला डोळस करुन वैचारिक दिशा देणारे राहिले. राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकारांची मैत्री जमली असता शाहू महाराजांनी त्यांना अनेकदा तपासून पाहिले. मात्र पैशाने विकत घेता येणार नाही असा एकमेव माणूस असे गौरवोद्गार शाहू राजांनी प्रबोधनकारांविषयी काढले. महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर, गाडगेबाबा हे सुधारक प्रबोधनकारांना जवळचे वाटत. खरा ब्राम्हण हे संत एकनाथ महाराजांवरील नाट्य, रंगो बापूजी हे इतिहासाचा धांडोळा घेणारी मांडणी, ग्रामण्यांचा इतिहास, भिक्षुकशाहीचे बंड, देवळांचा धर्म, कोंदडांचा टणत्कार अशी एकापेक्षा एक सरस मांडणी करून त्यांनी जातीयवादी लेखकांना सळो की पळो करून सोडले. प्रबोधनकार ठाकरे हिंदुत्व मानायचे. मात्र हिंदुत्व मानत असतांना मुसलमानांचा द्वेष केलाच पाहिजे हे त्यांच्या तत्वात न बसणारे होते. जातीयवादाला थारा न देता राष्ट्रीयत्वाचा विचारही त्यांनी दिला.. धार्मिक जळमटे दूर करतांना त्यांनी देवदेवतांचीही तमा बाळगली नाही. बौध्दधर्म परागंदा होईपर्यंत भारतीय इतिहासातील देवळांचा सुगावा लागत नाही तोपर्यंत आमचे देव काय थंडीने कुडकुडत होते की काय? असा घणाघात त्यांनी केला. त्यांनी ग्रंथपूजा कधीच केली नाही. उलट बहुजन समाजाला यातून बाहेर आणण्याचे काम प्रबोधनकारांनी केले आहे. बहुजन समाजाला शतकानुशतके पुरेल अशी ग्रंथसंपदा त्यांनी दिली. बहुजन व पुरोगामी चळवळीसाठी प्रबोधनकार ठाकरे ऊर्जा केंद्र ठरले आहे. पत्रकार, लेखक, समाजसुधारक, नाट्य कंपनीचे चालक, छायाचित्रकार, ब्राम्हणेत्तर चळवळीचे समर्थक आणि सत्यशोधक समाजाचे ब्रॅन्ड अॅम्बेसडर अशी ओळख असणारा हा माणूस या शतकातील अपैलू हिरा ठरावा असाच आहे. महाराष्ट्राला वैचारिक वळण लावणाऱ्या या कलावंताचा महाराष्ट्र कायम ऋणी राहीला आहे.*