संविधान दिन : ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे आयोजन
बुलढाणा : सामाजिक लोकशाही हा जीवनमार्ग आहे. तर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जीवनतत्वे आहेत. राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रुपांतर केले पाहिजे, हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवण्याकरिता आणि सामाजिक लोकशाहीसाठी संविधान गरजेचे आहे, असे प्रतिपादन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे संस्थापक सुनील शेळके यांनी केले.
संघटनेच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. मंचावर जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा समन्वयक प्रमोद टाले, ऍड. सुभाष विणकर, शाहीर के. ओ. बावस्कर, संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना सुनील शेळके म्हणाले, संविधानाने भारतीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. प्रत्येकाने संविधानाचा आदर केला पाहिजे. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या महामानवांना अभिवादन करुन आज ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान जनजागृतीसाठी संघटना कटिबद्ध आहे.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा समन्वयक प्रमोद टाले यांनी संविधान सभा गठन व त्यावेळी आलेल्या अडचणींवर मत व्यक्त केले. ज्येष्ठ अधिवक्ता सुभाष विणकर यांनी संविधानाची ओळख व कलमांचे महत्व यावेळी सांगितले. शाहीर के. ओ. बावस्कर यांनी संविधानाचे गीत गात पोवाडा सादर केला. संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे यांनी सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने संविधानाचे महत्व विशद केले. विविध सामाजिक संघटना तसेच शहरातील पतसंस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती.
संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन अनिल पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांनी केले. संचलन संजय खांडवे यांनी तर आभार मुरलीधर टेकाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन राऊत, उदय देशमुख, योगेश महाजन, सतीश राजपूत, राहुल बाजारे, संदीप सावळे, अनिल पडोळकर, केशव भोलाणे, नीतेश साखरे, प्रवीण चिंचोले, शुभम शिरसाट यांनी परिश्रम घेतले.