अवकाळी ‘ मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा
* आ. श्वेताताई महाले यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
चिखली
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागामार्फत त्वरित करण्यात यावे अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. या संदर्भातील निवेदन २९ नोव्हेंबर २०२३ रोजी आ. महाले यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना सादर केले.
चिखली आणि बुलढाणा तालुक्यात २७ नोव्हेंबर २०२३ पासून अवकाळी अतिवृष्टीमुळे व काही ठिकाणी गारपिटीने खरीप पिकांसह रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. चिखली विधानसभा मतदार संघातील चिखली तालुक्यात नुकत्याच पेरणी झालेल्या हरभरा आणि गव्हाचे पिकं बाळसे धरलेले होते. सोयाबीन सोबत पेरलेली तुरीचे तर बुलडाणा तालुक्यात चांडोळ ,धाड परिसरात मका पिकाचे, जांब, मौंढाला बोधेगाव या परिसरात कपाशी पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. प्राथमिक अंदाजानुसार २९ महसुली मंडळात जरी नुकसान दिसत असले तरी यापेक्षा जास्त महसुली मंडळात प्रचंड नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी वीज पडून जीवित हानी झालेली आहे. माझ्या चिखली विधानसभा मतदार संघातील अंबाशी येथील रामराव तुकाराम जाधव यांची गाभण म्हैस विज पडून मरण पावल्याने पशू पालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
याशिवाय खरीप हंगामातील तुर पीक जमिनीवर लोळण घेत असल्याने हाता तोंडाशी आलेली तूर निसर्गाने हिरावून घेतली आहे. नगदी पीक असलेले भाजी पाला पिके तर नेस्तनाबूत झालेली आहे. त्यामूळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी महा संकटात सापडला आहे. त्यामूळे बुलडाणा जिल्हासह चिखली आणि बुलडाणा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी जिल्हाधिकारी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.