सैलानीबाबा यात्रेच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करा
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
- यात्रा समन्वय समितीची पूर्वतयारी आढावा बैठक
- यंत्रणेमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना
- मुबलक पाणी, अखंड वीजपुरवठा करण्याचे दिले निर्देश
बुलडाणा, दि. 29 (जिमाका):जिल्ह्यात 15 मार्च 2024 पासून पिंपळगाव सराई परिसरात सैलानी बाबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, ही यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित जिल्हा यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून, त्याचे सूक्ष्म नियोजन करावे आणि नियोजनानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृह येथे आयोजित यात्रेच्या पूर्वतयारीचा समन्वय समितीतील सदस्यांचा त्यांनी आज आढावा घेतला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपळगाव सराई येथे सैलानी बाबा दर्गा परिसरात यात्रा महोत्सव राहणार असून, त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन, दर्गा ट्रस्ट आणि पिंपळगाव सराई ग्रामपंचायत यांची संयुक्त पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आज आढावा बैठक घेतली.
अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) समाधान वाघ, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग) राहुल जाधव, कार्यकारी अभियंता (बांधकाम) एस. एस. गुडधे, पिंपळगाव सराईच्या सरपंच श्रीमती रुपाली तरमले, अपर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद जाधव, सैलानी ट्रस्टचे सचिव ॲङ संतोष वानखेडे उपअभियंता व्ही. आर. काकर, गटविकास अधिकारी श्रीमती सरिता पवार, सहायक गटविकास अधिकारी एस.डी. तायडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उस्मान शेख, नगररचना विभागाचे सहायक संचालक एस. एस. वेरुळकर, सहायक पोलीस निरीक्षक दुर्गेश राजपूत, वनपाल एस. ए. आंबेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सैलानी बाबा यात्रेमध्ये नारळाची होळी, संदल मिरवणूक आणि फातेखानी अशा तीन टप्प्यात चालणारी असून, या कालावधीत जिल्हा प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत आणि ट्रस्ट यांची समन्वय समिती स्थापन करून जबाबदारीचे सूक्ष्म नियोजन करावे. या नियोजनानुसार दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाव्यात, यात्रा काळात यंत्रणांनी दक्ष राहून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.
यात्रा परिसरात महिला यात्रेकरुंसाठी पुरेशा प्रमाणात फिरते स्वच्छता गृह उपलब्ध करून द्यावेत. त्यामध्ये मुबलक पाणीपुरवठा करावा. तसेच ती स्वच्छ ठेवावीत. यात्रा कालावधीमध्ये महावितरण विभागाने अखंडीत वीजपुरवठा करण्यावर विशेष भर देत, भारनियमन राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच जनावरे कत्तलखाना व्यवस्थापन, वाहन तळांची योग्य व्यवस्था करणे, ध्वनीक्षेपकांवरून येथील सुविधांची यात्रेकरूंना माहिती देत राहणे, रस्त्यांची स्वच्छता, गर्दीचे योग्य व्यवस्थापन, नियोजन करणे, त्यासाठी सर्व समन्वय समितीमध्ये सहभागी असलेल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करणे, दर्गा परिसरात आवश्यक तिथे सीसीटीव्ही लावून गर्दीवर देखरेख ठेवणे, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या योग्य समन्वयातून रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिल्या.
तसेच या दरम्यान येणाऱ्या सर्व वाहनांची संख्या, यात्रेकरुंची संख्या, आणि मुक्कामी राहणारांच्या संख्येची शक्य झाल्यास माहिती मिळवावी. वाहनतळ व्यवस्था, ड्रोनच्या सहाय्याने गर्दीवर लक्ष ठेवणे यासह गर्दी नियंत्रित करण्यासाठी रस्त्यावर वाहने उभी राहता कामा नयेत, जेणेकरून जिल्हा प्रशासनाला मदत होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठा विभागाने टँकरच्या सहाय्याने मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करावा तो करताना ब्लिचिंग पावडर वापरण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. यात्रा कालावधीमध्ये सर्व परिसराचा नकाशा तयार करून विभागानुसार जबाबदारीचे वाटप करावे. पुरेसा प्रकाश देणारे पथदिवे, अग्निशामक यंत्रणा, वीज वितरण विभागाने स्टॉल्सच्या ठिकाणी लावण्यात येणारी वीज उपकरणे यांची सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण तपासणी करावी, जेणेकरून यात्रा कालावधीमध्ये अनुचित घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिले.
तसेच यात्रा कालावधीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने अडचणी आल्यास तज्ज्ञ डॉक्टरासह आरोग्य पथक, सर्व वैद्कीय यंत्रणा, अत्यावश्यक सोयीसुविधांनी युक्त रुग्णवाहिका तयार ठेवावी यासह परिसरातील भक्त निवास, मंगल कार्यालये, शाळा या तात्पुरत्या ताब्यात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी समन्वय करणाऱ्या जिल्हा यंत्रणेला दिले.
***