नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या – जयश्रीताई शेळके
* विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिले निवेदन
बुलढाणा
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲड. जयश्रीताई शेळके यांनी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच घरांचीही पडझड झाली आहे. गुरुवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यात गारपीट आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जयश्रीताई शेळके यांनी वडेट्टीवार यांच्यासोबत जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करुन चर्चा केली. जिल्ह्यात २७ व २८ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाने थैमान घातले. विजांचा कडकडाट, गारपीट, वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २९ मंडळात अतिवृष्टी झाली. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ३६ हजार हेक्टर शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तूर, हरभरा, कपाशी, भाजीपाला, संत्रा, मोसंबी, पेरु, द्राक्ष, डाळींब, तूर या पिकांना चांगलाच फटका बसला. सर्वाधिक नुकसान हे नांदुरा तालुक्यात झाले. जिल्ह्यातील २८७ गावे बाधित झाली आहेत. पशुधनाची सुद्धा मोठी हानी झाली आहे. वीज पडून ८६ मेंढ्या दगावल्या तर एक बैल ठार झाला. तब्बल ५२ घरांची पडझड झाली आहे.
अवकाळीने जिल्ह्यातील १००६ शेडनेट उध्वस्त झाले आहेत. भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा तालुक्यात शेतकऱ्यांनी शेडनेट व पॉलिहाऊसची उभारणी मोठ्या प्रमाणात केली आहे. यासाठी लाखोंचा खर्च देखील केला आहे. मात्र अवकाळी पावसाने शेडनेटला प्रचंड तडाखा दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी जयश्रीताई शेळके यांनी केली.