व्यंकटगिरीवर चार दिवस रंगणार ब्रह्मोत्सव 

व्यंकटगिरीवर चार दिवस रंगणार ब्रह्मोत्सव 

* १६ ते १९ डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक  उत्सवाची तयारी सुरु
बुलढाणा 
       शहरापासून जवळच असलेल्या आणि राजूर घाटातील व्यंकटगिरी पर्वतावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १९ डिसेंबर असे चार दिवस होम, यज्ञ आणि पूजा तसेच संगीत भजन व कीर्तन असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. ब्रह्मोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मोठ्या भक्तीभावाने आणि जल्लोषात हा ब्रह्मोत्सव पार पडणार आहे.
      बालाजी सेवा समिती आणि बालाजी भक्त परिवारच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वर्षातून एकदा साजरा होणारा हा प्रमुख आणि सर्वात महत्वाचा उत्सव आहे. बालाजी मंदिरात नुकतीच नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत ब्रह्मोत्सवाच्या तयारीबाबत चर्चा करुन विविध समित्या गठीत करण्यात आल्या. १६ डिसेंबर पासून ब्रह्मोत्सवाला सुरुवात होणार आहे. शनिवारी सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत संकल्प, पुण्यवचन, यज्ञ शाळा प्रवेश आणि बालाजी परिक्रमा, रविवार, १७ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ५ ते ८ संकल्प, यज्ञ शाळा, महासुदर्शन होम व बालाजी परिक्रमा, सोमवार, १८ डिसेंबर रोजी सकाळी ७८ ते १२ संकल्प, पुण्यवचन, यज्ञ पूजन आणि बालाजी परिक्रम तर सायंकाळी ७ ते साडेआठ या वेळेत कल्याणोत्सव अर्थात श्रीदेवी व भुदेवी यांच्यासोबत बालाजींचा विवाह सोहळा पार पडणार आहे आणि त्यानंतर ८.३० ते १० वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण होणार आहे. १९ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ संकल्प, पुण्यवचन, १०८ कलश पुजन आणि पूर्णाहुती सोहळा होणार असून दुपारी १२.३० ते १ महाआरती होणार आहे. त्यानंतर काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद वितरणास सुरुवात होणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन बालाजी सेवा समितीचे अध्यक्ष अरुण दिवटे तसेच बालाजी भक्ताच्या वतीने करण्यात आले आहे.
 
* दररोज संगीत भजन व कीर्तन : 
       ब्रह्मोत्सवादरम्यान दररोज दुपारी २ ते ३ या वेळेत संगीत भजन रंगणार आहेत तर ३ ते ५ या वेळेत कीर्तन होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान आपेगाव, ता. पैठण. चे अध्यक्ष हभप. अध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर विष्णू महाराज, कोल्हापूरकर दादा हे कीर्तन सेवा देणार आहेत. तसेच काल्याचे कीर्तन देखील त्यांच्या अमृतवाणीतून होणार आहे. ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हभप. ज्ञानेश्वर विष्णू महाराज यांचे कीर्तन श्रवण करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे, हे विशेष.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *