रिकाम्या खुर्चीला घातला हार : दोन दिवसांत निलंबन मागे घेण्याचे आश्वासन
बुलढाणा, दि. ६
कर्तव्यदक्ष शिक्षक आणि ग्राम विकास अधिकाऱ्याचे नियमबाह्य केलेले निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी ६ डिसेंबर रोजी वंचित बहुजन युवा आघाडीने जिल्हा परिषद प्रशासनाला चांगलेच वेठीस धरले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या मांडण्यात आला. सीईओ हजर नसल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
निलंबन रद्द करेपर्यंत जागचे हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी घेताच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) समाधान वाघ व शिक्षणाधिकारी खरात यांनी दोन दिवसांत निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यातील इजलापूर जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक रविकांत जाधव तसेच पिंपळगाव सराईच्या ग्रामविकास अधिकारी ज्योती मगर यांचा कर्तव्यात कुठलाही कसूर नसताना बीडीओ सुनीता पवार यांनी दोघांचे निलंबन केले. शिक्षक जाधव यांनी शिक्षण विभागात उल्लेखनीय कार्य केले आहे. शासनाने दखल घेत त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे. मात्र, शिस्तभंगाचा आरोप ठेऊन निलंबित करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी ज्योती मगर यांच्यावर द्वेषभावनेने आणि राजकीय दबावाखाली निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे नमूद करीत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी अन्यायकारक कारवाई मागे घेण्यासाठी सीईओंना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.