मायलेकावर अत्याचार : अमोल खबुतरेसह दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध गुन्हे दाखल
‘वंचित युवा’ने एकाच दिवसांत मिळवून दिला न्याय : शेती बळकावल्याने मतिमंदासह आईने सुरू केले होते उपोषण
बुलढाणा,
शेतजमीन बळकावून जातिवाचक शिवीगाळ करत वेळोवेळी त्रास दिल्याने न्याय मिळण्यासाठी आठ दिवसांपासून उपोषण सुरू केलेल्या आमखेड येथील कासाबाई गवई व मतिमंद मुलगा शिवाजी यांना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी एकाच दिवसांत न्याय मिळवून दिला. सुस्त प्रशासन कुठलीच कारवाई करत नसल्याचे दिसताच सतीश पवार यांनी कायदेशीर मार्गाने लढा सुरू केला. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पीडित कुटुंबीयांची न्याय्य मागणी रेटून धरली. तसेच सतीश पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळीच चिखली पोलीस ठाणे गाठले. गवई मायलेकाची सत्याची बाजू ठाणेदार संग्राम पाटील यांच्या लक्षात आणून देत अमोल खबुतरेसह अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करवून घेण्यात आला.
शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या ‘एफआयआर’ची कॉपी हाती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ९ डिसेंबरला सतीश पवार यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन कासाबाई गवई व मतिमंद शिवाजी गवई यांचे उपोषण सोडविण्यात आले. एकाच दिवसात काही तासांच्या घडामोडींदरम्यान न्याय मिळवून दिल्याने वृद्ध कासाबाई यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीचे आभार मानले.
चिखली तालुक्यातील आमखेड येथील रहिवासी मतिमंद शिवाजी गवई यांच्या मालकीची ०.७० आर शेतजमिन चिखली येथील अमोल सुरेशआप्पा खबुतरे याने बळकावली आहे. शिवाजी गवई यांच्या मतिमंदतेचा फायदा घेऊन फसवणूक करत खरेदी खत तयार करण्यात आले. तसेच या शेतात जाण्यास गवई कुटुंबीयांना मज्जाव केला. शिवाजीचे थोरले भाऊ रमेश गवई व विलास गवई तसेच आई कासाबाई यांना अमोल खबुतरेसह दोघांनी जातिवाचक शिवीगाळ केली. शेतात गाडून टाकण्याच्या धमक्या दिल्या. तसेच कासाबाई यांना अभद्र बोलून नग्न धिंड काढण्याच्या धमक्या दिल्या. १८ मे २०२२ व २८ नोव्हेंबर २०२३ रोजी शेतात हा प्रकार घडला. शेती परत मिळून दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी वृद्ध कासाबाई यांनी आपला मुलगा शिवाजीला सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्यांच्या उपोषणाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते.
गुन्हे दाखल झाल्यानंतरच सोडले पोलीस ठाणे
वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी हे प्रकरण ‘वंचित’च्या कोर्टात घेतले. मतिमंद शिवाजी गवई यांच्या वतीने त्यांचे भाऊ रमेश गवई यांना सोबत घेऊन चिखली पोलीस ठाण्यात धडक देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य ठाणेदार संग्राम पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पोलीस प्रशासनाला न्यायोचित सूचना दिल्या होत्या. गुन्हा दाखल होईपर्यंत सतीश पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे सोडले नाही. या प्रकरणात अमोल खबुतरेसह अन्य एकाविरुद्ध भादंवि कलम २९४, ५०४, ५०६, ३४ व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३ (१) (आर), ३ (१) (एस) गुन्हे नोंदवण्यात आले. शेतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या निकालाअंती न्याय मिळेलच, असा विश्वास सतीश पवार यांनी व्यक्त केला.
अन्याय, अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरू : पवार
या प्रकरणात वृद्ध मायलेकांना न्याय मिळवून दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश पवार म्हणाले, खबुतरे कुटुंबीयांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. या कुटुंबीयांशी संबंधित अजूनही काही पीडित लोकांचे फोन आले असून, त्याही प्रकरणांना लवकरच वाचा फोडू, असे सांगतानाच यापुढे अनुसूचित जाती, जमातीमधील व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांवर अन्याय, अत्याचार झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येतील, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.