बुलढाण्यातील महिला परिषद ठरली चिंतन परिषद- विविध ठरावही झाले पारीत
सामाजिक बांधिलकीतून उतराई होण्याचा प्रयत्न करूया -डॉक्टर शिंगणे
आयुष्यात काय कराव याचे उत्तर अनेकदा मिळत नाही. मात्र इतरांचे संसार उभे करणारी आजची विधवा परिषद महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. विधवांच्या समस्या आहेत मान्य आहे.. मात्र समस्यांना घाबरून जाऊ नका. धैर्याने पुढे या. तुम्ही एकट्या नाही आम्ही आपल्या सोबत आहोत. असा आशावाद डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी महिला परिषदेत व्यक्त केला.
शिवसाई परिवाराचे प्रा. डी एस लहाने यांच्या संकल्पनेतून मानस फाउंडेशनच्या पुढाकाराणे तुलसी नगर येथे आज 10 डिसेंबर रोजी ऐतिहासिक अशी महिला परिषद पार पडली.
परिषदेचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील होते. तर उद्घाटक म्हणून माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदूमती लहाने, डॉक्टर वसंतराव चिंचोले, श्रीमती पांडे आजी, पत्रकार गणेश निकम केळवदकर, प्राचार्य शाहीना पठाण, जिजाताई चांदेकर, प्रतिभा भुतेकर, साहित्यिक सुरेश साबळे, माधवराव हुडेकर, डॉक्टर शोण चिंचोले, सुनील सपकाळ, डॉक्टर मनोहर तुपकर, प्रा. राम बारोटे,अमोल रिंढे,प्रशांत वाघोदे, मनोज दांडगे, राजेंद्र काळे,लक्ष्मीकांत बगाडे,दीपक मोरे, डॉक्टर गायत्री सावजी निर्मला तायडे, जयश्री बोराडे, अश्विनी सोनवणे आदींची उपस्थिती लाभली.
पुढे बोलताना डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले- एकेकाळी महिलांचा पती वारल्यानंतर ती महिला सती जायांची. शंभर टक्के पुरुशी वर्चस्व समाजात राहिले. अमर्याद अधिकाराने महिलांना अनंत अडचणी आल्या समाजधुरीणांनी वेळोवेळी बदल केले असे असले तरी 21 व्या शतकात देखील विधवा महिलांच्या समस्या संपल्या असे नाही. विशेषतः विधवांना आजही बंधनात राहावे लागते. मात्र बंधने जाचक आहेत ती झुगारलीच पाहिजे. ज्या महिलांनी बंधने झुगारली त्यांनी प्रगती साधली. आयुष्यात काय करावे याचे उत्तर बऱ्याच जणांना मिळत नाही. इतरांचे संसार उभे करण्याची प्राध्यापक डी एस लहाने यांची धडपड पाहता त्यांना याचे उत्तर मिळाले आहे.असे कौतुकोद्गार काढून डॉक्टर शिंगणे यांनी आजची महिला परिषद राज्याच्या इतिहासात ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक डीएस लहाने यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी आयोजना मागची भूमिका मांडली महिला. महिला विधवा झाली की तिला करंट्या पायाची म्हटले जाते. जी मुलगी लक्ष्मीच्या रूपांनी तुमच्या घरात येते ती करंट्या कपाळाची कशी होते? असा प्रश्न उपस्थित करून लहाने यांनी विधवांच्या समस्यांना हात घातला. सामाजिक बदल,विधवांच्या समस्या सोडवून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.संचलन प्रतिभा भुतेकर यांनी केले.
बॉक्स
श्रीमुक्ती संघटनेच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदूमती लहाने यांनी मानवतावादी उपेक्षित वर्गाला न्याय देणारी परिषदा असल्याचे सांगितले. उपेक्षित महिलांसाठी पुरुषांनी पुढाकार घेतल्याचे पाहून समाधान वाटले असे सांगून त्यांनी ..तू मला काय टाकतोस- मीच कात टाकते असा जोश भरला. वर्धक्यातही श्रीमुक्तीचा हुंकार तेवढ्याच ताकतीने मांडून त्यांनी उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
मानसिक बद्दल स्वीकारून वाटचाल करा– जिल्हाधिकारी
आपण एकटे आहोत आपल्यासाठी कोणीतरी येईल व आपल्या समस्या सोडविल अशी आस बाळगू नका. मानसिक बदल स्वीकारा, याची सुरुवात स्वतःपासून करा. सक्षमपणे उभे रहा आणि वाटचाल करा, आपण भूतकाळ बदलू शकत नसलो तरी भविष्यकाळ आपल्या हातात आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले. यावेळी डॉक्टर किरण पाटील यांनी जिजाऊ सारखे खंबीर होण्याचे आवाहन उपस्थित विधवा महिलांना केले. शिवरायांना पितृछत्र मिळाले नाही, त्यांना मातृछत्र मिळाले, त्याकाळी जिजाऊ सती गेल्या नाहीत तर त्यांनी शिवाजी महाराजांसारखा राजा घडविला एवढेच नव्हे तर विधवा असणाऱ्या जिजाऊ राज्याभिषेकालाही उपस्थित राहिल्या हा आदर्श आपण घ्यावा असे सांगून त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
परिषदेत ठरावांचे वाचन
विधवा महिला परिषद कशासाठी? या परिषदेचा उद्देश स्पस्ट करणाऱ्या ठरावांचे वाचन परिषदेच्या उद्घाटनाचा सत्रात करण्यात आले. पत्रकार गणेश निकम केळवदकर यांनी ठराव वाचन केले तर त्याला उपस्थित भगिनींनी व पुरुषांनी हात उंचावून दाद दिली. विधवा घटस्फोटीत महिलांना सन्मान जनक स्थान मिळावे यासाठी पुढाकार घेणे, विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे, शासनाने त्याचा कृती आराखडा तयार करावा, विधवा पुनर्विवाह साठी कायद्याने अनुदान द्यावे, वारसा हक्काने मिळणारे अधिकार विधवा महिलेस द्यावे अशे वेगवेगळे ठराव घेण्यात आले. सुचक गणेश निकम, प्राचार्य शाहिना पठाण, प्रतिभा भुतेकर, प्राचार्य ज्योती पाटील होते. तर साहित्यिक सुरेश साबळे, निर्मला तायडे, जयश्री बोराडे, अश्विनी सोनवणे मनीषा वारे यांनी अनुमोदन दिले.