वन बुलढाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा कार्यक्रमांतर्गत शेगाव तालुक्यातील पहूरपूर्णा, लोणार तालुक्यातील रायगाव व जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील संवाद मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संदीप शेळके यांचा विकास आणि परिवर्तनाच्या विचार जिल्हावासीयांना भावला.
राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके गावोगावी जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीला शेगाव तालुक्यातील पहूरपूर्णा, २ जानेवारीला लोणार तालुक्यातील रायगाव आणि ३ जानेवारीला जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे संवाद मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेऊन वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ कार्यरत आहे. याअंतर्गत जाहीरनामा जनतेचा ही संकल्पना मांडली आहे. राजकीय पक्ष आपला जाहीरनामा आणतात. संदीप शेळके जनतेचा जाहीरनामा आणणार आहेत. जिल्ह्याचा विकास कसा हवा, हे जनतेने ठरवावे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यासाठी गावोगावी जाऊन ते जिल्हावासीयांशी संवाद साधत आहेत.
पहुरपूर्णा, रायगाव, भेंडवळ या तिन्ही सभेला माता- भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक प्रचंड संख्येने हजर होते. जिल्ह्यातील नागरिकांना परिवर्तन हवे आहे, बदल हवा आहे. लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने दिली. आमच्या अनेक समस्या, आमचे अनेक प्रश्न जैसे थे असल्याच्या भावना यावेळी ग्रामस्थांनी बोलून दाखवल्या.जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास असलेल्या वन बुलढाणा मिशन या लोकचळवळीसोबत राहण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
* राजकीय इच्छाशक्तीअभावी विकास मंदावला
जिल्ह्यात रोजगार, सिंचन, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्ह्यात चांगल्या एमआयडीसी नाहीत. मोठे उद्योग नाहीत. एकही साखर कारखाना नाही, सूतगिरणी नाही, दुधसंघ नाही. त्यामुळे युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. राजकारणी मंडळी याकडे गांभीर्याने बघत नाहीत. राजकीय इच्छाशक्तीअभावी जिल्ह्याचा विकास मंदावला असा, घणाघात संदीप शेळके यांनी केला.