राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी
अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी केली पाहणी
सिंदखेड राजा : राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे १२ ते १५ जानेवारीदरम्यान मातोश्री लॉन्सच्या बाजूला आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान ७ जानेवारी रोजी अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी तयारीची पाहणी केली.
मातृतीर्थ सिंदखेड राजा हे राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने अभिता ऍग्रो एक्स्पो २०२४ हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या वर्षातील हा भव्य कृषी महोत्सव असेल, असा विश्वास सुनिल शेळके यांनी व्यक्त केला. कृषी विभाग व कृषि विज्ञान केंद्राच्या सहकार्याने हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे व्यवस्थापन बालाजी मल्टीमिडीया इव्हेंट्सचे नरेन काकडे यांच्याकडे असणार आहे.
या कृषी प्रदर्शनात राज्यातील सुमारे २०० ते २५० स्टॉलधारक सहभागी होणार आहेत. कृषी क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, शेती तंत्रज्ञान, कुक्कुटपालन आणि पशुधन, दुग्धव्यवसाय, कृषी सेवा, अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान इत्यादीचे प्रदर्शन करण्यासाठी एकाच छताखाली एक उत्कृष्ट विचारपीठ उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी ग्राहकांना थेट भेटण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख शेतक-यांना करून देण्याची ही सुवर्णसंधी असणार आहे. शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.