आजचा युवक नोकरीच्या मागे धावतांना दिसत आहे. स्पर्धेच्या युगात नोकऱ्या मिळणे अवघड झाले आहे. यामधून नैराश्य आणी इतर समस्या वाढल्या आहेत. येणारा काळ कृषीक्षेत्राचा आहे. युवकांनी शेती, शेतीपूरक व्यवसायाची कास धरुन शेतीमातीशी नाते तोडू नये, असे आवाहन अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी केले.
राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त अभिता ऍग्रो इंडस्ट्रीज आणि शासनाचा कृषी विभाग यांच्यावतीने आयोजित अभिता ऍग्रो एक्स्पो राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा १५ जानेवारी २०२४ रोजी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी देविदास ठाकरे होते. यावेळी सुनील शेळके, ऍड. जयश्री शेळके, शिवाजीराजे जाधव, विष्णू मेहेत्रे, फकिरासेठ जाधव, रामदास काळे, शिवप्रसाद ठाकरे, भगवान सावळे, प्रा.कमलेश खिल्लारे, सुरेश हुसे, गजानन मुंढे, पुरुषोत्तम बोर्डे, राहुल झोरे, संजय आडे, रघुनाथ नागरे,चनू देशमुख, सीताराम चौधरी, नंदू वाघमारे, छगन झोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील मातोश्री लॉन्सच्या बाजूला १२ जानेवारी रोजी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उदघाटन झाले होते. सोहळ्याला पाच राज्यांतील प्रगतीशील शेतकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कन्या प्रतीक्षा जायभाये हिच्या हस्ते जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन जिजाऊंना मानवंदना देण्यात आली.
समारोपीय कार्यक्रमाला राजेश आढाव, विनोद ठाकरे, बाबासाहेब गव्हाड, राजू खरात, शिवाजी गव्हाड, मनोज वाघ, बाळू पवार, राजेश्वर खरात, किशोर खेडेकर,गजानन हनवते, ज्ञानेश्वर जाधव,सारंगधर अंभोरे, विशाल चौधरी, गौतम खरात, अभिमान उगले, गणेश चाटे, विनोद गव्हाड, डॉ.सोळंके यांची उपस्थिती होती.
* एक लाख नागरिकांनी दिली प्रदर्शनाला भेट :
शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, शेतीतील नवनवीन प्रयोग शिकायला मिळावे, प्रगतीशील शेतकऱ्यांपासून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन घेण्यात आले. कृषी प्रदर्शनात शेतीसंदर्भात विविध प्रकारचे १५० स्टॉल लावण्यात आले होते. जवळपास एक लाख नागरिकांनी स्टॉलला भेटी देऊन माहिती जाणून घेतली. नववर्षात प्रयोगशील शेती करण्याचा संकल्प केला.
* सर्वच उपक्रमांना नागरिकांची भरभरुन दाद :
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनातील सर्वच उपक्रमांना नागरिकांनी भरभरुन दाद दिली. १२ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी प्रितम सिंग (हरियाणा), सुरेंद्र अवाना (राजस्थान ), धिरेंद्रकुमार देसाई (गुजरात), सुखजितसिंग भंगु (पंजाब), पांडुरंग पाटील (गोवा ), रवींद्र मेटकर (अमरावती), सुधाकर चौधरी या प्रगतीशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला. १३ जानेवारी रोजी प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी आयोजित महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १४ जानेवारी रोजी आयोजित पशुपक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह विद्यार्थी आणि नागरिकांची गर्दी झाली होती.
* डोणगावच्या ‘युवराज’ ने पटकावले प्रथम बक्षीस :
पशुपक्षी प्रदर्शनात डोणगाव येथील मुरा जातीचा दोन वर्षीय रेडा युवराज प्रथम बक्षिसाचा मानकरी ठरला. पशुपालक कृष्णा घोगडे यांना प्रथम बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. तर सिंदखेडराजा येथील राजहंस हर्षवर्धन ढवळे, मो. उस्मान अब्दुल नबी (मुरा म्हैस, दे.राजा), शिवप्रसाद ठाकरे सिंदखेडराजा, अतुल खेकाळे (कुत्रा, सिंदखेडराजा), सुभाष टाकळकर ( गाय – शेळी – सि. राजा), अतुल शिंदे – रेडा, पठार देऊळगाव राजा) या पशुपालकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.