मागील अनेक महिन्यापासून आपण शेतकऱ्यांसह रस्त्यावर लढत आहोत. मात्र निवडणूक अभियान राबविणारे मुख्यमंत्री असो वा अन्य सत्ताधारी नेते असो, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सवड नाही. यामुळे आमचा संयम संपला असून येत्या १९ जानेवारी २०२४ ला ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना तुपकर यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत नवीन आंदोलनाची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, बुलढाण्यापुरते सांगायचे झाल्यास जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्टेशन येथे आंदोलन करण्यात येईल. १९ जानेवारीला सकाळी ६ वाजताच आंदोलनाला सुरू करण्यात येणार आहे. यावेळी हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मुंबई, दिल्ली व गुजरात राज्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रोखणार आहे. जीव गेला तर चालेल, पण स्थानकातून एकही रेल्वे सुटू देणार नाही, असे तुपकर यांनी यावेळी सांगितले.
या आंदोलनाची कारण मीमांसा सांगताना ते म्हणाले की, मागील ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही लाखो सोयाबिन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी विविध टप्प्यात आंदोलने करीत आहे. एल्गार मोर्चा, रथयात्रा, मंत्रालय ताब्यात घेणे, अन्नत्याग आदी आंदोलनाच्या माध्यमाने आम्ही राज्य व केंद्र शासनाकडे मागण्या रेटल्या. सोयाबिन, कपाशीला दरवाढ, यलो मोझाक, लाल्या, बोण्ड अळीमुळे झालेली नुकसानीची भरपाई, पीकविमा, नैसर्गिक आपत्तीची भरपाई, सोयापेंड, पामतेल आयात बंद करावी या मागण्यांना राज्य व केंद्राने मान्यता दिली. मात्र कारवाई शून्य असून शेतकऱ्यांना कवडीची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी चोहोबाजूंनी संकटात सापडला असताना मुख्यमंत्री शिवसंकल्प अभियान राबवून लोकसभेची तयारी करीत आहे. त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही की मदतीसाठी त्यांच्याजवळ पैसा नाही, असे विचित्र चित्र आहे.
आता शेतकऱ्यांचा संयम संपल्याने रेल्वे रोको करण्यात येत आहे. सरकारला आम्ही १८ जाने वारीची मुदत दिली आहे. त्या मुदतीत मदत मिळाली नाही तर आंदोलन अटळ असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले.