* मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव काढणार रथयात्रा
बुलढाणा
२२ जानेवारीचा दिवस संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा स्मरणीय करण्यासाठी संदीप शेळके यांच्या नेतृत्वातील ‘वन बुलडाणा मिशन’ने पुढाकार घेतला आहे. २२ जानेवारीला वन बुलडाणा मिशनच्यावतीने मातृतीर्थ सिंदखेडराजा ते संतनगरी शेगाव अशी श्रीराम वंदना यात्रा काढण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊंना वंदन करून सकाळी ५:४५ ला या यात्रेला सुरुवात होणार असून यात्रा रात्री ८ वाजता संतनगरी शेगावात पोहचणार आहे.
वन बुलडाणा मिशन या राजकीय लोकचळवळीला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संदीप शेळकेंच्या संवाद सभांना होत असलेली गर्दी अन् त्यातही मुद्द्याचे राजकारण यामुळे संदीप शेळके यांची लोकप्रियता वाढत चाललेली आहे. दरम्यान आता श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम वंदना यात्रेची देखील जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात विविध अर्थाने चर्चा सुरू आहे.
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा विषय हा राजकीय नाही तर राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे. प्रभू श्रीराम चंद्राचे जन्मभूमीत मंदिर होणे ही गौरवाची बाब आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक सोहळा स्मरणीय व्हावा यासाठीच श्रीराम वंदना यात्रा असल्याचे वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आपला अजेंडा आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या मांगल्यासाठी आपण प्रार्थना करणार असल्याचे ते म्हणाले.
* असा आहे यात्रेचा मार्ग :
मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतून सुरू होणारी श्रीराम वंदना यात्रा किनगाव राजा, वीरपांग्रा, बिबी, मांडवा, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा, लव्हाळा फाटा, मंगरूळ नवघरे, अमडापुर, उदयनगर, खामगाव मार्गे संतनगरी शेगावात दाखल होणार आहे. यात्रेदरम्यान गावोगावच्या मंदिरात पुजन होणार आहे. इंडीयन आयडॉल फेम सुप्रसिद्ध गायक राहुल खरे या यात्रेदरम्यान गीतरामायण तसेच राम भक्तीची गीते सादर करणार आहेत.