आगीत टूनकी येथील राजनकर कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी
संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथे अचानक घराला आग लागल्याची घटना २० जानेवारी २०२४ रोजी सकाळी घडली. याबाबत माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी आगग्रस्त कुटुंबाची भेट घेतली. साडीचोळी व आर्थिक मदत देऊन कुटुंबास हिंमत देण्याचे काम केले.
टूनकी येथील महादेव राजनकर व सुनीता महादेव राजनकर हे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह चालवतात. या दाम्पत्याच्या घराला शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. आगीत संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाली. घरातील सामान, कपडे, धान्य व इतर वस्तू जळून खाक झाल्या. यामुळे राजनकर कुटुंबावर भयंकर संकट कोसळले आहे.
शनिवारी सकाळीच पती-पत्नी दोघेही मजुरी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. अचानक सदर दुर्दैवी घटना घडली. या घटनेने हे कुटुंब पूर्णपणे बेघर झाले आहे. गावातील व परिसरातील लोक त्यांचे दुःख पाहून हळहळ व्यक्त करत आहेत.