आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी १ नोव्हेंबर रोजी आशा व गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीबाबत घोषणा करून आशा वर्कर्सच्या मानधनात ७ हजार रुपये व गटप्रवर्तकच्या मानधनात १० हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती. त्याला प्रतिसाद देत आशा व गटप्रवर्तकांच्या संघटनेने 18 ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान पुकारलेला बेमुदत संप संघटनेने स्थगित केला. परंतु या घोषणेला दोन महिने उलटून गेल्यावर सुद्धा त्या मानधन वाढीचा शासन निर्णय सरकारने अद्याप काढलेला नाही.
सरकारने या मानधन वाढीचा शासन निर्णय तातडीने काढून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ.गायकवाड यांनी २४ जानेवारी २०२४ रोजी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या धरणे व निदर्शने आंदोलनात सरकारकडे केली. या बेमुदत संपाला राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघटनेच्या संयुक्त कृतीसमितीने आशा व गटप्रवर्तकांच्या बेमुदत संपाला सक्रिय पाठिंबा देऊन याबाबतचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिले आहे. त्यासाठी २९ जानेवारी २०२४ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर प्रचंड मोर्च्याचे आयोजन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे प्रमुख समन्वयक तथा सीटू चे राज्य अध्यक्ष डॉक्टर डी. एल. कराड यांनी संघटनेला दिली. या २९ जानेवारीच्या मुंबई येथील आंदोलनात जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक तसेच ४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका मदतीसांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड पंजाबराव गायकवाड यांनी केले आहे.
या धरणे आंदोलनात संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष ललिता बोदडे, राज्य कौन्सिल मेंबर जयश्री तायडे, सचिव स्वाती वायाळ ,शोभा बगाडे, कविता चव्हाण, अलका राजपूत, रेखा नागरे, शारदा लिंगायत, विजया ठाकरे ,संगीता गवळीकर, गंगा अंभोरे, रंजना मोरे, निर्मला माघाडे, अन्नपूर्णा आढाव ,ज्योती डुकरे, भारती देशमुख, सविता बाठे, आरती सोनटक्के, अर्चना तायडे, सुनिता राठोड, अनुपमा जाधव, पुष्पा सुरडकर, मुक्ता काकर, सविता म्हस्के, रजनी गणगणे, सुमित्रा लिहिणार इत्यादीसह शेकडो जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी उपस्थित आशा व गटप्रवर्तकांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.