शेतकऱ्यांनी शेतीला प्रयोगशाळा मानून प्रयोग करावेत -खासदार प्रतापराव जाधव

मेहकर येथे कृषि महोत्सव, प्रदर्शनीला सुरवात

बुलडाणा, दि. 25 : शेती नफ्याची होण्यासाठी पुढच्या पिढीवर सकारात्मक संस्कार होणे गरजेचे आहे. कष्ट केल्यानंतर शेती नफ्याची होते. तसेच शेती ही एक प्रयोगशाळा आहे, या शेतीमध्ये जेवढे जास्‍त प्रयोग केले जातील, तेवढी त्यात सुधारणा होईल, असे मत खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले. कृषि प्रदर्शनीचे उद्घाटन आज खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी आमदार संजय रायमुलकर स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, मेहकर बाजार समितीचे सभापती माधव जाधव, लोणार बाजार समितीचे सभापती बळीराम मापारी, मेहकर बाजार समितीचे उपसभापती विलास मेहरूत, लोणार बाजार समितीचे उपसभापती जगाराव आडे उपस्थित होते.

खासदार जाधव म्हणाले, शेतमध्ये विविध प्रयोग करणे शक्य आहे. या प्रयोगातून शेतीची उत्पादकता वाढते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी पारंपरीक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करावी. खतांचा वापर करताना संतुलीत मात्रे खतांचा उपयोग केल्यास शेतपिकांपासून चांगले उत्पादन मिळण्यास मदत होईल. कृषि प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, आजही आपली शेती प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूरक व्यवसायाची कास धरावी. शेतीसोबत जोडधंदा केल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होऊन आर्थिक प्रगती होण्यास मदत मिळत असल्याचे सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कृषि विभागातर्फे मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील प्रांगणात कृषि महोत्सव आणि कृषि प्रदर्शनीस आजपासून सुरुवात करण्यात आली. दि. 29 जानेवारीपर्यंत कृषि महोत्सव सुरू राहणार आहे. नागरिकांनी या कृषि प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *