खामगाव – जालना रेल्वेमार्गाचा विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार – ना दिलीप वळसे पाटील
चिखली : बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या खामगाव जालना या प्रलंबित रेल्वे मार्गाला महाराष्ट्र शासनाने 50% राज्य हिस्सा मंजूर करावा या संबंधिता विषय आपण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले दिनांक 26 जानेवारी रोजी रेल्वे लोक आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नामदार वळसे पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी यासंबंधीचे ग्वाही दिली.
राज्याचे सहकार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रजासत्ताक दिनानिमित्त बुलढाणा येथे आले असता चिखलीच्या शासकीय विश्रामगृहावर रेल्वे लोकांदोलन समितीच्या वतीने डॉ किशोर वळसे, रेणुकादास मुळे व संतोष लोखंडे यांनी त्यांची त्यांची भेट घेतली. यावेळी खामगाव जालना रेल्वेमार्गाविषयी चर्चा झाली. या रेल्वे मार्गाबद्दलचे निवेदन रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने दिलीप वळसे पाटील यांना सादर करण्यात आले. खामगाव – जालना या रेल्वेमार्गाला ५० टक्के राज्य हिसा देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासन ना. वळसे पाटील यांनी यावेळी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शंतनु बोंद्रे, चिखली विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष बाळू पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर बोंद्रे, शहराध्यक्ष तुषार बोंद्रे, माजी नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती राजीव जावळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.