बुलढाण्यात विविध देशांमधील भिक्खूंच्या उपस्थितीत १० मार्चला जागतिक धम्म परिषद

बेरोजगारांसाठी बिझनेस एक्स्पोचेही आयोजन : विशेष कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंतांना ‘मूकनायक बुलढाणा’ पुरस्कार देणार

येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट कॉलेज) प्रांगणात १० मार्च २०२४ रोजी जागतिक धम्म परिषद व बिझनेस एक्स्पो पार पडणार आहे. धम्म परिषदेला विविध देशातील भिक्खू संघ संबोधित करणार आहेत. या सोबतच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने बिझनेस एक्स्पोचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.
धम्म परिषदेच्या आनंदी पर्वावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘मूकनायक बुलढाणा’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात ही परिषद व बिझनेस एक्स्पो घेण्यात येत आहे. यामध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, मूकनायक फाउंडेशन व महार रेजिमेंट यांचा विशेष सहभाग राहणार आहे.
बिझनेस एक्स्पोसाठी जिल्हा खादी ग्रामद्योग, जिल्हा उद्योग केंद्र, विविध राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था तसेच विविध बचत गटांनादेखील आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून अनेक उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बुलढाण्यात होणारी जागतिक धम्म परिषद ऐतिहासिक करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. ही परिषद अविस्मरणीय राहावी, याकरिता जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांना ‘मूकनायक बुलढाणा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

उपस्थित राहण्याचे सतीश पवार यांचे आवाहन
विविध देशांमधील नामवंत भिक्खूंच्या साक्षीने पार पडणाऱ्या धम्म परिषदेला तमाम धम्मबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *