रविकांत तुपकरांचा जामीन रद्द करण्याची पोलिसांची याचिका जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळली

* न्यायालयाचा निर्णय येताच तुपकरांकडून निर्धार रथयात्रेची घोषणा
बुलडाणा 
         आंदोलनातील गुन्ह्यात रविकांत तुपकरांना दिलेला जामीन रद्द करून त्यांना तुरुंगात ठेवावे, अशी मागणी, पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे केली होती. त्याप्रकरणी मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने निकाल जाहीर केला. न्यायालयाने रविकांत तुपकर यांच्या विरोधातील याचिका फेटाळून लावत त्यांचा जामीन कायम ठेवला आहे. या निकालाची माहिती मिळताच जिल्हाभरातील शेतकरी, कष्टकरी, तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर न्यायालयाचा निकाल येताच रविकांत तुपकरांनी जिल्ह्यात निर्धार रथयायात्रेची घोषणा केली असून २२ फेब्रु. रोजी खामगाव तालुक्यातून या यात्रेला सुरुवात होणार आहे. संपूर्ण जिल्हा ताकदीने पिंजून काढणार असल्याचे रविकांत यांनी यावेळी सांगितले आहे. सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी, लोकसभेत परिवर्तन करण्यासाठी ही निर्धार रथयात्रा असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.


* अखेर सत्याचा विजय – रविकांत तुपकर
       न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. न्यायालयाच्या निर्णयाने सत्याचा विजय झाला आहे. काही सत्ताधारी नेत्यांनी मला तुरुंगात डांबण्याचा डाव आखला होता पण तो आजच्या निर्णयाने उधळून लावला आहे. सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, तरुण तसेच गावगाडा आणि शहरातील नागरिकांचा आपल्या पाठीशी असलेला आशीर्वाद मला प्रत्येक संकटातून तारुन नेत आहे. सर्वसामान्य जनतेचा हाच आशीर्वाद आता जिल्हात परिवर्तन घडविणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, अडचणीत आहेत. शेतमालाला भाव नाही, सिंचनाची सोय नाही, दुसरीकडे तरुणांसाठी रोजगार नाही. जिल्ह्यात मोठी एमआयडीसी नाही प्रोजेक्ट नाहीत, यूपीएससी-एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या अभ्यासिका नाहीत, एकंदरीत नानाविध अडचणी या जिल्ह्यात आहेत, अनेक समस्या आहेत. या सर्व समस्या आणि अडचणींना वाचा फोडण्यासाठी आपण निर्धार यात्रा काढत आहोत, असे रविकांत तुपकरांनी यावेळी सांगितले

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *