शिवराय नसते तर महाराष्ट्राचा इतिहासच नाही तर भूगोल वेगळा असता- जयश्रीताई शेळके

शिवराय नसते तर महाराष्ट्राचा इतिहासच नाही तर भूगोल वेगळा असता- जयश्रीताई शेळके

मोहदरी येथे शिव व्याख्यान : माता- भगिणींसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मेहकर : तारुण्यात वादळालाही शमवण्याची ताकद असली पाहिजे. छत्रपती शिवरायांनी तारुण्यात क्रांती घडवली. तसेच प्रत्येक महापुरुषांनी तारुण्यात क्रांती घडवली आहे. छत्रपती शिवराय नसते तर कदाचित इथला इतिहास वेगळा राहिला असता. केवळ इतिहासच नाही तर महाराष्ट्राचा भूगोल वेगळा राहिला असता. तरुणांनी शिवरायांचा विचार अंगिकारावा, असे प्रतिपादन काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी केले.

तालुक्यातील मोहदरी येथील ग्रामस्थांच्यावतीने १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मोहदरीच्या सरपंच लक्ष्मीताई बोढे, मा. उपसभापती मीताताई म्हस्के, निताताई लोढे, गंगुताई लोढे, निताताई लोढे, ललीताताई इंगळे, करणखेडच्या मा. सरपंच अनिताताई गायकवाड, अर्चनाताई शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने माता- भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पुढे बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या, आयुष्यात वय खूप महत्वाचे असते. योग्य वयात योग्य कामे मार्गी लावता यायला पाहिजे. प्रत्येक महापुरुषांनी कमी वयात क्रांतीकारी काम केल्याचे आपणास दिसून येते. छत्रपती शिवरायांनी १६ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. छत्रपती संभाजीराजांनी १४ व्या वर्षी बुद्धभूषणम हा ग्रंथ लिहला. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी वयाच्या २१ व्या वर्षी मुलींची पहिली शाळा काढली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी वयाच्या २३ व्या वर्षी कृष्ठरोग्यांसाठी आपल्या संस्थानांमध्ये व्हिक्टोरिया असायलमची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वयाच्या २९ व्या वर्षी १९२० साली मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. या वयात आपली मुलं काय करतात? याबाबत पालकांनी विचार करण्याची गरज असल्याचे जयश्रीताई शेळके म्हणाल्या.

….बॉक्स….

स्वराज्यात मातृशक्तीला पुरेपूर स्वतंत्र

राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ, शहाजी राजे यांनी शिवबांवर योग्य संस्कार करुन त्यांना छत्रपती म्हणून घडवले. शिवराय मोहिमेवर असतांना जिजाऊ स्वराज्याचा संपूर्ण मुलकी कारभार पाहायच्या. छत्रपती संभाजी महाराजांनी तर दोन पावले पुढे जाऊन आपली पत्नी येसूबाई यांना सर्व अधिकार दिले होते. त्यांना स्वतंत्र राजमुद्रा दिलेली होती. सही व शिक्क्याचे अधिकार दिलेले होते. याचा अर्थ स्वराज्यात मातृशक्तीला महत्वाचे स्थान आणि निर्णय प्रक्रियेत पुरेपूर स्वतंत्र होते, असे जयश्रीताई शेळके म्हणाल्या.

…बॉक्स….

शिवरायांनी शेतकऱ्यांच्या भल्याचे धोरण राबवले

आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो. मात्र केवळ त्यांचा जयजयकार करुन चालणार नाही. तर त्यांच्या विचारानुसार वागले पाहिजे. शिवरायांनी आपल्या सैनिकांना सक्त ताकीद दिली होती की, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. शेतकऱ्यांच्या भल्याचे धोरण त्यांनी राबवले. शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत दिली. अडचणीच्या काळात त्यांना दिलेली कर्जे माफ केली. शेतकरी, कष्टकरी, स्वराज्यातील प्रत्येक नागरिक सुखी झाला पाहिजे यासाठी शिवराय अहोरात्र झटले, असे विचार जयश्रीताई शेळके यांनी मांडले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *