नुकसानग्रस्तांना भरघोस मदत द्या- जयश्रीताई शेळके विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नुकसानग्रस्तांना भरघोस मदत द्या- जयश्रीताई शेळके

विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

बुलढाणा : जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस मदत देऊन पाठबळ द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी २८ फेब्रुवारी रोजी विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.

जिल्ह्यात २६ व २७ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्याने थैमान घातले. यामध्ये २६ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, मका, कांदा, पानमळे, भाजीपाला, फळपीकांना फटका बसला. जिल्ह्यातील २५९ गावांमधील ३१ हजार ५१० शेतकरी नुकसानाच्या कचाट्यात सापडल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद, खामगाव, नांदुरा, सिंदखेड राजा, बुलढाणा, लोणार, देऊळगाव राजा या आठ तालुक्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. सर्वात जास्त नुकसान संग्रामपूर तालुक्यात झाले आहे. ८ हजार ८९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला, संत्रा आणि फळबागांचे नुकसान झाले. एकट्या संग्रामपूर तालुक्यात तब्बल १५ हजार ३२२ शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसला. जळगाव जामोदमधील ४ हजार ४८८ शेतकऱ्यांना फटका बसला असून ३ हजार ७९१ हेक्टरवरील पिकांना झळ पोहचली. खामगाव ५१२ शेतकऱ्यांचे ३८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यात १ हजार २०० हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून २ हजार ३५० शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अवकाळीने चुराडा केला.

मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील २ हजार ९१८ शेतकऱ्यांच्या २ हजार १०४ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. जिल्ह्याचे ठिकाण बुलढाणा सुद्धा अवकाळीच्या तडाख्यात सापडले असून ३ हजार ४०० शेतकऱ्यांचे २ हजार १९० हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. लोणार तालुक्यात ९६० शेतकऱ्यांच्या ८९० हेक्टर क्षेत्रावरील पिकांची धूळधाण झाली. देऊळगाव राजा तालुक्यातील १ हजार ५७० शेतकऱ्यांच्या २ हजार ३१४ हेक्टरवरील रब्बी पिके भुईसपाट झाली आहेत. जिल्ह्यातील शेडनेटधारक शेतकऱ्यांना सुद्धा या अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.

अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने पिकांचे तर नुकसान झालेच मात्र अनेक ठिकाणे झाडे कोलमडली. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. शेतकऱ्यांवर एकामागून एक संकटे कोसळत आहेत. सरकारने केवळ घोषणा करुन जमणार नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना ठोस मदत घ्यावी लागेल. खरं तर झालेले नुकसान खुप मोठे आहे. त्याहून शेतकऱ्यांचे दुःख खूप मोठे आहे. कितीही मदत जाहीर केली तरी थोडकीच पडेल, असे जयश्रीताई शेळके यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *