मतदारांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेत
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 28 : आगामी काळात लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. यात पोलिस विभागाची भूमिका महत्वाची राहणार आहे. मतदारांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी पावले उचलावीत, तसेच कठोर निर्णय घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज नियोजन सभागृहात पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, समाधान गायकवाड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. महामुनी, जिल्हा सूचना अधिकारी सुनील खुळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, येत्या काळात निवडणूक विषयक कार्यवाही प्राधान्याचा विषय असणार आहे. निवडणूक कामकाजात विविध ॲपचा उपयोग होणार आहे. त्या अनुषंगाने याबाबतची माहिती यासंबंधित प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. या ॲपच्या माध्यमातून एकत्रित करण्यात आलेली माहिती ही निवडणूक आयोगाला दिसणार आहे. त्यामुळे यात गांभीर्याने कामकाज करणे आवश्यक आहे. तसेच पथकाकडून केलेल्या कारवाईची माहिती अचूकपणे समाविष्ट करणे गरजेचे आहे. यात कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा करण्यात येऊ नये. फिरत्या पथकाच्या प्रमुखाला दंडाधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे विविध कारवाई करताना सोयीचे होणार आहे.
सी-व्हीजीलच्या माध्यमातून नागरिक आचारसंहिता भंगबाबत तक्रारी करू शकणार आहे. यावर आलेल्या तक्रारीवर फिरत्या पथकाने तात्काळ कार्यवाही करावी. तसेच तपासणी पथकाने गांजा, अवैध दारू किंवा इतर बाबतीत जप्तीची कार्यवाही करावी. बँकांनी रोख रक्कम वाहतूक करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. संपूर्ण निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवू नये यासाठी दक्ष राहावे. निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम ही अत्यंत संवेदनशील आहे. याबाबत कोणतीही तडजोड करू नये. ईव्हीएमबाबत आलेल्या प्रत्येक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी श्री. शेलार यांनी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी देण्यात येणाऱ्या सुविधेबाबत माहिती दिली. श्री. महामुनी यांनी निवडणूक प्रक्रिया गांभीर्यपूर्वक घेऊन दररोज अहवाल सादर करावा, तसेच निर्भय वातावरणात निवडणूक होण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. प्रशिक्षणात श्री. गायकवाड यांनी आदर्श आचारसंहिता, श्री. खुळे यांनी सी-व्हीजील ॲप, शरद पाटील यांनी ईएसएमएस, श्री. पुरी यांनी निवडणूक खर्चाबाबत माहिती दिली. श्रीमती गोणेवार यांनी निवडणूक विषयक कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सूचना सांगितल्या.