बुलढाण्यातील ऐतिहासिक धम्म परिषदेची सुवर्णाक्षरांनी नोंद बुद्धांच्या धम्मानेच जगाचे कल्याण

भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांचा उपदेश : धम्मदेसनेला विराट गर्दी : बुद्ध अनुयायांनी सहा तास शांतचित्ताने ऐकले प्रवचन
बुलढाणा, दि. ९ (प्रतिनिधी)

बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात शनिवार, ९ मार्चला पार पडलेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेची ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशी नोंद सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेली. ही परिषद प्रबुद्ध भारत निर्माणाच्या धम्म क्रांतीची ज्योत पेटवणारी ठरली. तथागत गौतम बुद्धांच्या धम्मानेच जगाचे कल्याण होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धमय भारत निर्माण करण्यासाठी जी चळवळ उभी केली होती, त्या धम्म चळवळीला बळकटी देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरु भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांनी आपल्या धम्मप्रवचनात केले. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा मूकनायक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांच्या विशेष पुढाकारातून, मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाभरातील धम्मबांधवांच्या सहकार्याने ही परिषद यशस्वी झाली. हजारोंच्या संख्येने धम्मबांधवांनी सहभाग नोंदवून बुद्धमय भारत घडविण्याचा निर्धार केला.

सकाळी साडेदहा वाजेपासून सुरू झालेली परिषद सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत चालली. भिक्खूंचे धम्मप्रवचन तब्बल सहा तास चालले, ते बुद्ध अनुयायांनी शांतचित्ताने ऐकले. जागतिक कीर्तीचे धम्मगुरु, बुद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक, संशोधक, तथागतांच्या मानवतावादी जागतिक कल्याणाचा, प्रज्ञा, शील, मैत्रीचा संदेश आपल्या पांडित्यपूर्ण आणि करुणामय वाणीने जगभर प्रचार, प्रसार करणारे भन्ते ज्ञानज्योती महाथेरो हे धम्म परिषदेचे खास आकर्षण होते. सोबतच श्रीलंकेहून आलेले भन्ते शांतचित्त थेरो, भन्ते यश, भन्ते गुणानंद, भन्ते पुन्न यांची प्रमुख उपस्थिती होती.

धम्म परिषदेच्या स्थळावर भिक्खू संघाचे आगमन होताच धम्म भगिनींनी त्यांच्याचरणी फुलांची उधळण करून भन्तेंजींचे स्वागत केले. सकाळी साडेदहा वाजता भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. धम्मपीठावर विराजमान झाल्यानंतर भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांनी पंचशील व बुद्धवंदना दिली. भन्ते पुन्न, भन्ते गुणानंद, भन्ते यश, भन्ते शांतचित्त थेरो यांनी आपल्या धम्मवाणीतून बौद्ध धर्म, बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन, मैत्री याविषयी धम्मदेसना दिली.
आपल्या प्रवचनात भन्ते ज्ञानज्योती म्हणाले, बुद्ध धम्म म्हणजे क्रांती होय. धम्म म्हणजे निती. धम्म कुठलाच धर्म नसतो. तो सत्य, शुद्ध असतो. आर्य सत्याचा साक्षात्कार माणूस घडवतो. राजकीय लोकशाही ही सामाजिक, आर्थिक लोकशाही व सांस्कृतिक लोकशाहीमध्ये बदलण्यासाठी बाबासाहेबांनी रिपब्लिकन ऑफ इंडिया, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल या संघटना यासाठी दिल्या होत्या. मात्र, आज त्यांची काय अवस्था करून ठेवली, हे सर्वांना दिसते. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक समता निर्माण करून खऱ्या अर्थाने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव या मानवी मूल्यांवर आधारित जीवन पद्धतीच्या लोकशाहीची सध्या गरज आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या चार संघटनांना पुनरुज्जीवत करण्याच्या कामाला लागा, असे आवाहन ज्ञानज्योती यांनी यावेळी केले. भिक्खू संघाशिवाय धम्म चळवळ पुढे सरकणार नाही. त्यांच्या सहभागानेच मूळ बुद्धवाणी संपूर्ण जगात जशीच्या तशीच जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भिक्खू संघाने महापरित्राणपाठ, पुण्यानुमोदन केल्यानंतर परिषदेचा यशस्वी समारोप झाला. परिषदेचे मुख्य आयोजक सतीश पवार यांच्यासह संभाजीनगर येथील ज्येष्ठ समाजसेवक भीमराव मुगदल, बालाभाऊ राऊत, अर्जून खरात, ॲड. कैलास कदम, सुरेश जाधव, अनिल पारवे, प्रा. किरण पवार, अजय पडघान, चंद्रशेखर धंदरे, साहेबराव पारवे, निरंजन जाधव, राहुल वानखेडे, आय.टी. इंगळे, के.पी. इंगळे, अशोक हिवाळे, कमलाकर काकडे, सतीश गुरचवळे, अनंता मिसाळ, एस.एस. सुरडकर, समाधान पवार, संतोष कदम, लक्ष्मण साळवे, उद्धव वाकोडे, डॉ. राहुल दाभाडे, गौतम गवई, प्रभाकर जाधव, द्वारकाबाई इंगळे, संदीप मोरे यांच्यासह धम्मबांधवांनी धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.

चारचाकी रॅली ठरली आकर्षण

मलकापूर रोडवरील बुद्ध, फुले आणि बाबासाहेब यांच्या तीन पुतळ्यापासून ते धम्म परिषदेपर्यंत काढण्यात आलेली चारचाकी वाहनांची रॅली लक्षवेधी ठरली. जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरु पूज्य भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांच्यासह श्रीलंकेहून आलेल्या भिक्खू संघातील भन्तेंना फुलांनी सजविलेल्या दोन जिप्सी वाहनात विराजमान करण्यात आले. पुढे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती असलेले वाहन व त्या मागे भन्ते आणि धम्मबांधवांची वाहने शिस्तीत एका मागोमाग निघाली.

सातरत्नांचा ‘मूकनायक बुलढाणा’ पुरस्काराने गौरव

ऐतिहासिक ठरलेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत जिल्ह्यातील सातरत्नांचा मुख्य आयोजक सतीश पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन ‘मूकनायक बुलढाणा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. गृहमंत्रालयाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, पुणे येथील उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, ज्येष्ठ साहित्यिक नारायणराव जाधव येळगावकर, वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. पंजाब हिरे, सैनिकी क्षेत्रातील कमांडट कॅप्टन मोनिका साळवे, उद्योजक डॉ. अर्चित हिवाळे आणि सामाजिक सेवेबद्दल लक्ष्मण साळवे हे सातरत्न या पुरस्काराचे मानकरी ठरले.

प्रबुद्ध भारतासाठी दहा महत्त्वपूर्ण ठराव संमत

‘मी संपूर्ण भारत बौद्धमय करेन’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वचनपूर्ती, तथागत गौतम बुद्ध यांचे विचार आणि मानवतेचा संदेश जनमनात रुजविण्याकरिता तथा बुद्धमय भारताच्या निर्मितीसाठी, शांती प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आजच्या धम्म परिषदेत दहा महत्त्वपूर्ण ठरावांची घोषणा करून ते एकमताने मंजूर करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रतिभावंतांच्या ‘मूकनायक बुलढाणा’ पुरस्कार देत अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्या धम्माचा प्रचार, प्रसार अधिक गतीने करण्यासाठी गावपातळीवर धम्म संस्कार केंद्रांची उभारणी करणे, भारत ही बुद्धांची भूमि असल्याच्या स्मृति जागविण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जागतिक बौद्ध धम्म परिषद घेणे, गावागावात बुद्धविहारांमध्ये वर्षातून दोनवेळा श्रामणेर शिबिर घेणे, बुद्धविहारात भिक्खू व धम्मसेवकांची कायम नियुक्ती करणे, भारतातील प्राचीन बौद्ध लेणी, बौद्धस्तूप, बुद्धविहारांचे अवशेष, भोन येथे सापडलेल्या बुद्धकालीन वस्तूंचे अवशेष आणि जागा पुरातत्व विभागाकडे वर्ग करून तो ऐतिहासिक वारसा म्हणून नोंदविण्यासाठी न्यायालयीन लढा लढणे, बिहारचे बुद्धगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून न्यायालयीन लढा उभारणे, जागतिकस्तरावर स्पर्धा करण्यासाठी इंग्रजी माध्यम गरजेचे असल्याने बौद्ध धर्मातील विद्यार्थ्यांना ‘केजी टू पीजी’ इंग्रजी शाळा स्थापने, बौद्ध साहित्य पाली भाषेत असल्याने दर रविवारी बुद्धविहारात पाली भाषा शिकवणी वर्ग सुरू करणे, गतिमान जगाच्या दृष्टीने तंत्रज्ञानाची निकड असल्याने आर्टिफिशियल इंटलिजंट (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानासंदर्भात जागृती करणे, बौद्धमय भारतासाठी जागतिक पातळीवर बुद्धिस्ट राष्ट्रासोबत संबंध प्रस्थापित करून श्रीलंका, जपान, थायलंड, व्हिएतनाम, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया व अन्य देशांकडून सहकार्य घेणे असे ठराव संमत करण्यात आले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *