गांजासह कंटेनर पोलिसांच्या ताब्यात ; चालक अटक
* 51 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त
चिखली :
खामगाव ते जालना मार्गावरून अवैधरित्या वाहतूक होत असलेला 240 किलो गांजासह कंटेनर वाहनावर चिखली पोलीसांनी कारवाई केली. यावेळी 51 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 16 मार्चच्या दुपारी 3 वाजे दरम्यान चिखली जालना रोडवर करण्यात आली. या प्रकरणी उत्तर प्रदेश येथील कंटेनर चालकास अटक करण्यात आले आहे.
खामगाव ते जालना महामार्गाने युपी 21 सीएन 4035 क्रमांकाच्या कंटेनर मधुन गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे 16 मार्चच्या दुपारी जालना रोडवरील हॉटेल लालपरी समोर पोलीस विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व महसूल विभागाच्या पथकाने सापळा लावला. दरम्यान मिळालेल्या माहीतीनुसार चिखली शहराकडून एक लाल रंगाचा कंटेनर दिसताच त्यास थांबवुन पंचासमक्ष कंटेनरची झडती घेतली असता त्यामध्ये खाकी रंगाचे चिकटपट्टीने पॅकींग केलेले प्रत्येकी 5 किलो वजनाचे एकुण 42 पाकीटे वजन 210 किलो किंमत 31,50,000 आढळून आले. पाकीटातील पदार्थाची पाहणी केली असता त्यामध्ये उग्र वासाचा गांजासदृश्य पदार्थ दिसून आला. सदर पदार्थाचा बुलढाणा पोलीस दलाच्या श्वान पथकाचे संजय चाफले यांनी श्वान एंजल यास वास दिला असता श्वानाने सदर पदार्थ हे अंमली पदार्थ असल्याबाबत इंडीकेशन दिले. पोलीस व पंचांची खात्री होताच सदर कंटेनर चालक चंदरपाल जिवाराम रा. शांतीविहार बरेली उत्तर प्रदेश यास ताब्यात घेऊन कंटेनर व गांजाची पाकीटे असा एकुण 51लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करुन ताब्यात घेतला.
या प्रकरणी आरोपी विरूध्द चिखली पोलीसांनी अंमली पदार्थ प्रतीबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गांजा हा आरोपी याने कोठुन आणला, तो कोठे घेऊन चालला होता याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, ठाणेदार चिखली यांचे नेतृत्त्वात सपोनि संजय मातोंडकर, पोउपनि शरद भागवतकर, पोउपनि नितीनसिंह चौहाण, पोलीस अंमलदार विजय किटे, चंद्रशेखर मुरडकर, गजानन काकड, सुनिल राजपुत, सुरज राजपुत, जिल्हा वाहतुक शाखेचे पोनि रवी राठोड यांचे पथकातील निलेश शिंगणे, संतोष चिडे, श्वान पथकातील संजय चाफले यांचे पथकाने केली आहे.