बुलढाणा, दि. १९ (प्रतिनिधी)
वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सतीश पवार यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोपविली. जेमतेम वर्षभरापूर्वी सोपविलेल्या जबाबदारीचे भान ठेवत या पदाला अगदी प्रामाणिकपणे न्याय देण्याची भूमिका त्यांनी निभावल्याचे त्यांच्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध झाले आहे. जनसामान्यांनादेखील आपण तोच न्याय मिळवून देऊ ही जनभावना मनी बाळगून सतीश पवार आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवत असल्याचे जिल्हावासियांनी गतवर्षभरात विविध प्रकारची आंदोलने आणि त्यातून मार्गी लागलेल्या प्रश्नांमधून अनुभवले.
जिल्ह्यात असं एकही गाव नाही तिथे सतीश पवार नाव नाही, अशी स्थिती त्यांनी आपल्या कार्याने निर्माण केल्याचे चित्र आहे. प्रश्न कितीही किचकट, गुंतागुंतीचे असले तरी ते संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने कसे तडीस नेता येतील, ही त्यांची काम करण्याची खास हतोटी आहे. कुठेही नेता म्हणून नव्हे, तर एक कार्यकर्ता असल्याची जाणीव ठेवूनच ते रस्त्यावर उतरतात.
सामाजिक कार्यात नेहमीच झोकून देऊन काम करणारे सतीश पवार यांनी आपल्या कार्यकुशलतेने जनतेच्या मनाचा ठाव घेतला. सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या समस्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून सोडविल्या. जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेतून वेळप्रसंगी अधिकाऱ्यांशी त्यांच्याच प्रशासकीय भाषेत युक्तिवाद करून प्रश्न हाताळले आणि त्यांची सोडवणूकही केली. आपले तुणतुणे वाजविणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना आपल्या खास स्टाइलने वठणीवर आणून जनतेला न्याय दिला. हाती कोणतीही सत्ता सुत्रे नसताना हा कार्यकर्ता एवढ्या ताकदीने पुढे जात आहे, मग तो लोकसभेत गेला तर जिल्हावासियांना निश्चितच फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा ठेवत ‘सतीशदादा, तुम्ही लोकसभा लढवाच, निवडून आणण्याची जबाबदारी आमची’, असा निर्धार करत जनतेने त्यांच्याकडे खासदारकीची निवडणूक लढण्याचा रेटा धरला असून, तशी चर्चा होत आहे. ज्या जात प्रवर्गातून ते येतात, त्या प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ती मते निर्णायक ठरू शकतात, हीदेखील चर्चा यानिमित्ताने होत आहे.
विविध आंदोलने, सामाजिक कार्य व आपल्या स्वच्छ प्रतिमेमुळे सामाजिक माध्यमांवर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार हे लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चेचा विषय ठरू लागले आहेत. एकीकडे महाविकास आघाडी व वंचितच्या युतीचा विषय चर्चेचा ठरत असताना जिल्ह्यामध्ये मात्र समाज माध्यमावर सतीश पवार यांच्या खासदारकीच्या चर्चेला उधाण आल्याचे दिसत आहे. सतीश पवार यांची जिल्ह्यामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. त्यांच्या आंदोलनाला संविधानिक मार्गाची कायमच किनार असते. त्यामुळे प्रशासकीय अधिकारीदेखील त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला गांभीर्याने घेतात. जिल्ह्यातील विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न मांडणारा एकमेव नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी काढलेला एल्गार मोर्चा, ठिय्या आंदोलने, टॉवर आंदोलन तसेच शासन आपल्या दारी कार्यक्रमात दिलेले विद्यार्थ्यांचे एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन हे युवा वर्गाला विशेष भावले. तसेच अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या हजारो प्रकरणांसंदर्भात त्यांनी केलेले आंदोलन हे कक्षेबाहेरचे असल्याने लोकांच्या कायम स्मरणात राहिले. त्यांच्या आंदोलनाची न्यायालयाने दखल घेत न्यायाधीशांची रिक्तपदे भरण्यात आली. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची अन्यायकारक कारवाई मागे घ्यायला प्रशासनाला भाग पाडले. या आंदोलनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या मनात सतीश पवार यांच्याबद्दल आदराचे एक वेगळे स्थान निर्माण झाले.
अनेक प्रस्थापित सावकारांच्या जबड्यातून त्यांनी गरिबांच्या जमिनी सोडवून आणल्या. एवढेच नाही तर सावकार व त्यांच्या गुंडांवर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यास यंत्रणेला भाग पाडले. यामुळे पीडित व गरीब कुटुंबीयांसाठी सतीश पवार एक आशेचा किरण ठरले. राज्य सरकारने कंत्राटी तत्वावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा काढलेल्या अन्यायकारक अध्यादेशाची त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर होळी केली. अध्यादेशाविरुद्ध आंदोलन करणारे ते महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले. यामुळे सतीश पवार यांचे युवा वर्गातून राज्यभर कौतुक झाले.
कार्यकर्त्यांना मोठे करणारा माणूस
विशेष बाब म्हणजे कोणत्याही आंदोलनाला गालबोट लागले नाही किंबहुना सतीश पवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर आजपर्यंत साधा एनसीचा गुन्हासुद्धा दाखल झाला नाही. राजकीय नेत्यांमध्ये हे दुर्मिळच दिसून येते. कार्यकर्त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य करून सतीश पवार कायम प्रयत्न करतात. कार्यकर्त्यांचा विकास व्हावा आणि ते सुरक्षित राहावेत, हा त्यांचा कायम आग्रह असल्याने समाजमाध्यमातून या सर्जनशील नेत्यांची नेहमीच प्रशंसा होते. आज त्यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते त्यांच्या पायावर खंबीरपणे उभे आहेत.
राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वाने बनले नेता
सतीश पवार एक गरीब कुटुंबातील कार्यकर्ता आहेत. त्यांना कुठलाही राजकीय वारसा नाही. केवळ आपल्या स्वकर्तृत्वाने त्यांनी एक ‘दमदार नेता’ म्हणून आपली छाप पाडली आहे. राजकीय काम करत असताना सामाजिक कार्यातदेखील सतीश पवार हे जिल्हाभरात सदैव अग्रेसर असतात. त्यांच्या नेतृत्वात बुलढाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी विविध देशातील भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये जागतिक धम्म परिषद पार पडली. या धम्म परिषदेची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. त्यांची शिस्त आणि नियोजनबद्धता ही कायमच लोकांच्या मनावर कोरली आहे.