तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पातुर्डा बसस्थानक जवळ तामगाव पोलिसांनी सापळा रचून विदेशी दारूसह ३ लाख ५८ हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला २४ मार्च रोजी केली.
आगामी लोकसभा निवडणूक, रमजान ईद, होळी, धुलीवंदन उत्सवाच्या पार्श्वभूमिवर अनुचित प्रकार घडू नये, दक्ष, सर्तक रहावे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासणे यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान नजर चुकवून चोरट्या मार्गाने अवैध दारुची विना परवानगी वाहतूक केली जाते असल्याची गुप्त माहितीवरून तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अशोक वावगे, पोहेकॉ विष्णू कोल्हे, पोकॉ विकास गव्हाड यांनी कारवाई केली. यावेळी पांढऱ्या रंगाची एमएच ३०-बीबी ७३९१ या क्रमांकाच्या वाहनातून अवैध दारू वाहतूक करताना पकडली. त्यात विदेशी कंपनीच्या एकूण २५ काचेच्या बॉटल प्रत्येकी किंमत १५० रुपये, विदेशी कंपनीच्या एकूण ३० काचेच्या बॉटल प्रत्येकी किंमत १६० रुपये विदेशी कंपनीची दारु तसेच इतर साहित्य असा एकूण ३ लाख ५८ हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोहेकॉ विष्णू रामदास कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी पवन शंकर घुंगळ (वय २५) रा. उकळी बाजार, ता. तेल्हारा, जि. अकोला यांचे विरूध्द कलम ६५ (अ), (ई) मदका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पातुर्डा बिट जमदार पोहेकॉ दयाराम कुंसुंबे करित आहे.