दिव्यांग मतदार जागृतीसाठी विशेष प्रयत्न

दिव्यांग मतदाराच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज

बुलडाणा, दि. १५ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदार मतदानाच्या कर्तव्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी दिव्यांगासाठी काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांनी दिव्यांग जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले.

स्थानिक अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेच्या वतीने आज दिव्यांग मतदार जाणीव जागृती करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अजय कारंजकर, सचिव जयसिंग जयवार, दिव्यांग कल्याण विभागाचे सहाय्यक सल्लागार शालिग्राम पुंड आदी उपस्थित होते.

येत्या दि. २६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १ हजार ९६२ मतदान केंद्रावर बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दिव्यांग मतदारांसाठी सक्षम ॲप विकसित करण्यात आले आहे. यामध्ये नोंदणी करून दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर येण्याची सुविधा, व्हीलचेअर, तसेच आवश्यकता भासल्यास मागणीनुसार मदतनीस देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांनी विशेषत: नवमतदार, महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जाणीव जागृती करण्यात येत आहे.

 

मतदान प्रक्रियेतील प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी बी. एम. मोहन यांच्या पुढाकाराने विविध घटकांना केंद्रस्थानी ठेऊन सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग मतदारांसाठी स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जाणीव जागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

 

त्याअनुषंगाने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्ह्यातील सुमारे १८ हजार नवमतदार, सोळा हजार दिव्यांग मतदार, 30 हजार ज्येष्ठ मतदार यांच्यासह संपूर्ण मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहे.

 

दरम्यान जिल्ह्यातील सर्व दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मतदानाच्या कर्तव्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी संघटीत प्रयत्न करावेत, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी बी. एम. मोहन यांनी केले आहे

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *