राजे लखुजीराव जाधवांच्या समाधी परिसरात सापडले शिवमंदिर

राजे लखुजीराव जाधवांच्या समाधी परिसरात सापडले शिवमंदिर

सिंदखेडराजा 
     राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी परिसरात रविवारी शिवमंदिराचा शोध लागला आहे. अत्यंत सुबक नक्षीकाम असलेल्या दगडी चौकटी व गर्भगृहात मोठी शिव पिंड मिळाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
       मातृतीर्थ सिंदखेडराजा हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथे राजे लखुजीराव जाधव यांनी अनेक वर्षे आपली राजवट चालवली. सन १६२९ मध्ये त्यांची दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर हत्या झाली. त्यानंतर त्यांच्यावर शहराच्या पश्चिम भागात असलेल्या रामेश्वर मंदिर शेजारील जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. सन १६३० मध्ये त्यांच्या समाधी मंदिराचे बांधकाम सुरू झाले ते पुढील १० वर्षे चालले. देशातील हिंदु राजाची सर्वांत मोठी दगडी समाधी म्हणून या वास्तूची नोंद घेतली जाते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहराच्या ऐतिहासिक वास्तू जतन, संवर्धनाचे काम सुरू आहे.
 
     समाधी परिसरातदेखील केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत खोदकाम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. रविवारी असेच काम सुरू असताना येथे समाधी चौथऱ्यापासून पाच फूट खोल व समाधी मंदिरपासून साधारण २० फूट अंतरावर मोठी शिवपिंड दिसून आली. अधिक खोदकाम केले असता शिवपिंड असलेल्या बाजूला दर्शनी भागात सुबक नक्षीकाम असलेली चौकट मिळून आली आहे.शिव मंदिरच असल्याचा प्राथमिक अंदाज केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण टीमकडून करण्यात आला आहे. 
     दुसरीकडे समाधी परिसरात सापडलेले हे अवशेष, शिवपिंड हे तत्कालीन राजे घराण्यातील मोठ्या व्यक्तीची समाधी असण्याची शक्यता काही जाणत्यांनी व्यक्त केली आहे. राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी जिथे चिन्हीत आहेत, तेथेही पुरातन शिवपिंड दिसून येते. त्याच परिसरात असलेल्या तत्कालीन महिलांच्या समाधीमध्ये बांगड्या घातलेला महिलांचा उजवा हात दर्शविण्यात आला आहे. त्यावेळी हे चिन्ह सती जाणाऱ्या महिलांसाठी चिन्हीत केले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे रविवारी सापडलेली शिवपिंड हे मंदिर आहे की समाधी, या विषयाचा खुलासा होणे गरजेचे आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *