आज परिषद:मोताळावासिय ठरणार ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार..

आज परिषद:मोताळावासिय ठरणार ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार..

41 गावातील विधवांनी ठरविलंय परिषदेला जायचंय!

बुलडाणा

मोताळ्यात पार पडणारी विधवा परिषद ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत. या परिषदेची जययत तयारी मानस फाउंडेशन व शिवसाई परिवाराने केली आहे. यासाठी आयोजक प्रा डी एस लहाने रणरणत्या उन्हात पायाला भिंगरी लावून बैठका व आवश्यक ते नियोजन करीत आहे. मोताळा तालुक्यातील 41 गावांना त्यांनी भेटी देऊन विधवांशी संवाद साधला. यावेळी प्रत्येक गावातील विधवांनी आम्ही परिषदेला जायचं ठरवलंय.. असा आशावादी विश्वास दिल्याने 30 मे रोजी होणारी विधवा परिषद समाज बदलाकडे पाऊल टाकणारी असल्याने ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहे.

एखाद्या विषयाला वाहून घेणे कशाला म्हणतात ते सध्या प्राध्यापक डी एस लहाने यांच्या कार्यातून दिसून येत आहे. एकीकडे लग्नची धूम, असह्य होणारा उकाडा आणि या तळपत्या उन्हात पायाला भिंगरी लावून मोताळा तालुक्यातील पाच-पन्नास गावात भटकंती करण्याचे काम डी एस लहाने करीत आहे.प्रत्येक गावात जाऊन विधवा महिलांशी संवाद साधने, तुमच्यासाठीच मेळावा आहे, तुम्ही या.. मेळाव्यात सहभागी व्हा असे आवाहन करीत आहे. त्यांचं होणार छोटेखानी भाषण आणि त्या भाषणादरम्यान अनेक विधवांच्या डोळ्यातुन वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा खूप काही सांगून जातात. बेंबीच्या देठापासून आलेली भावना ही वरवर पोपटपंची पेक्षा आश्वासक ठरते. हेच प्राध्यापक लहाने यांनी सध्या दाखवून दिले आहे. त्यांचे निरागस प्रयत्न विधवा महिलांना भावत असून लहाने यांच्या रूपाने त्यांना मोठा भाऊ मिळाला आहे.

 

विधवा परिषद मोताळा येथे 30 मे रोजी 10 वाजता सुरू होणार आहे.
उद्घाटन सत्रानंतर चित्रपट निर्माते हरीष इताफे व यशदा च्या प्रशिक्षक पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या पुष्पलात भोरे यांचे व्याख्यान यानंतर परिषदेचे ठराव वाचन व विधवा महिलांचे मनोगत पार पडणार आहे.

 

परिषदेतून काय मिळणार?

ज्या विधवा महिलांचा पती सोडून गेला अशा तरुण विधवांना जोडीदार देण्याचा प्रयत्न विधवा परिषदेचा राहणार आहे. विधवा महिलांवर असलेली असंख्य जाचक बंधने सैल करणे, त्यांना सहृदय माणूस म्हणून स्वीकारणे यासाठी समाजाची मानसिकता तयार करण्याचे काम विधवा परिषद करणार आहे. सरकार दरबारी असणाऱ्या विधवांच्या योजना या योजनांची माहिती बऱ्याचदा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे काम विधवा परिषद करणार आहे. प्रत्येक गावामध्ये लग्न न झालेल्या तरुणांची संख्या फार मोठी आहे. त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत तर दुसरीकडे कमी वयात वैधव्य आल्याने विधवांना जोडीदार नाही हा समन्वय विधवा परिषदेच्या माध्यमातून साधला जाणार आहे.या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन डी एस लहाने यांनी केले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *