`ग्रामपंचायत आपल्या दारी` या अभियानास जामठी येथे प्रारंभ….
अभियानाचा पहिला टप्पा संपन्न….
जामठी | येथे शासनाच्या विविध योजनांचा गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी जामठी शेकापूर गट ग्रामपंचायतच्या वतीने जामठी येथे ग्रामपंचायत आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा उपक्रम जामठी येथे राबविण्याची अभिनव संकल्पना बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.मनोजभाऊ दांडगे यांनी मांडली आहे.काल (ता.२९) रोजी या उपक्रमाचा पहीला टप्पा संपन्न झाला आहे..
‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात यावा आणि या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनी ग्रामस्थांच्या थेट घरापर्यंत जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घ्याव्या.. त्या समस्या सोडविण्यावर भर असू द्यावा. असे आवाहन श्री.मनोजभाऊ दांडगे यांनी केले आहे.
शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी सुरू केलेल्या या
‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ अभियानास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे..
शासनाच्या वतीने गावच्या विकासासाठी विविध योजनांतर्गत ग्रामपंचायतला थेट निधी दिला जातो. गावातील अनेक लोकांना शासनाच्या योजनांची माहिती नसते. माहिती अभावी या योजनांचा लाभ गरजू लोकांना मिळत नाही. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या व गाव विकासाच्या विविध योजना गावकर्यांपर्यंत पोहोचवून गरजूंना त्याचा लाभ देण्यासाठी तसेच ग्रामस्थांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा उपक्रम राबविल्यास ग्रामस्थांना नक्कीच त्याचा फायदा होईल.
गावकर्यांना पाणी, रस्ते, पथदिवे, स्वच्छता, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन आदी प्रश्न सोडविण्यासाठी तसेच रहिवासी,जन्म-मृत्यू नोंद व इतर विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी व अन्य कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करावा लागतो. ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,तलाठी व ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी प्रत्यक्ष गावकर्यांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेऊन लगेचच मार्गी लावल्या.तर गावकर्यांचे श्रम, पैसा आणि वेळेची बचत होईल. गावकर्यांचे प्रश्न त्वरित सुटले तर त्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.यासाठी या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..आज या अभियानाच्या प्रारंभ-प्रसंगी जामठी शेकापुर गट ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,शांतता समितीचे अध्यक्ष,ग्रामसेवक,तलाठी,कृषी सहाय्यक,कोतवाल तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते..