30 मे म्हणजे बी. ओ.बोर्डे साहेबांची जयंती….. जयंती निमित्त विनम्र अभिवादन
30 मे 1955 या दिवशी बोर्ड साहेबांचा जन्म चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथे झाला. त्यांच्या घरी भरपूर शेतीवाडी असल्यामुळे त्यांच्या परिवाराचा संपूर्ण शेळगाव आटोळ या गावांमध्ये मध्ये दरारा होता. पोलीस पाटील सुद्धा खूप दिवसापासून त्यांच्याच घराण्यातील व्यक्ती आहे. पूर्वी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य त्यांच्याच घरातले असायचे. ग्रामपंचायत सुद्धा त्यांच्या घराण्याचे ताब्यात असायची.पूर्वीच्या काळी शेळगाव आटोळ हे बंड लोकांचे गाव म्हणून परिसरामध्ये प्रसिद्ध होते. पण मुळात शेळगाव आटोळ तसे ऐतिहासिक गाव या गावातील गावडे, आटोळे, जाधव व शेख हे काही परिवार नागपूरच्या भोसल्यांचे सरसेनापती संताजी आटोळे यांच्या सैन्याशी संबंधित होते. सरसेनापती संताजी आटोळे यांच्या आडनावावरून आटोळ्यांचे शेळगाव म्हणजे शेळगाव आटोळ असे नाव पडले. अशा या ऐतिहासिक शेळगाव आटोळ गावामध्ये बोर्डे साहेबांचे प्राथमिक शिक्षण संपन्न झाले व पुढील शिक्षणासाठी त्यांनी नगरपरिषद शाळा चिखली येथे प्रवेश घेतला. व त्या काळामध्ये अनुसूचित जाती,जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेले संत चोखामेळा वस्तीगृह या ठिकाणी सुद्धा त्यांनी प्रवेश घेतला. लहानपणापासून अभ्यासामध्ये हुशार असणाऱ्या बोर्डे साहेबांना दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले आणि ते पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. मिलिंद महाविद्यालयामध्ये पदवीधर होऊन त्यांनी एम. ए. साठी जिजामाता महाविद्यालय बुलढाणा या ठिकाणी प्रवेश घेतला. व त्यांनी एम.ए.पूर्ण केले. या दरम्यानच्या काळात त्यांचा संपर्क अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या दलित पँथर संघटनेशी आला. त्यावेळी दलित पॅंथरचे राष्ट्रीय नेतृत्व राजा ढाले व गंगाधर गाडे यांच्यासोबत त्यांचा खूप जवळून संपर्क आला.
त्यावेळी नामांतराचे आंदोलन खूप जोरात चालू होते. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते. त्या काळामध्ये मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी सरळ हैदराबादला जावे लागत होते. परंतु गरीब विद्यार्थ्यांसाठी ती खर्चिक बाब होती. म्हणून मराठवाड्यातील बहुजन समाजातील अनेक तरुण पैशाच्या अभावी शिक्षणापासून वंचित राहत होते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय व्हावी या सर्वोच्च हेतूने मिलिंद महाविद्यालयाची स्थापना औरंगाबाद येथे केली. अशा या क्रांतिकारी महाविद्यालयामध्ये बोर्डे साहेबांनी पदवीसाठी प्रवेश घेतला. आणि ओघा ओघाने ते नामांतराच्या लढ्यामध्ये सहभागी झाले. ते केवळ त्या लढ्यामध्ये सहभागी होते असे नाही तर बाबासाहेबांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालेच पाहिजे यासाठी त्यांनी तुरुंगवास सुद्धा भोगला. पदवीत्तर शिक्षणासाठी त्यांनी जिजामाता महाविद्यालय येथे प्रवेश घेतला. दलित पॅंथरच्या संपर्कामध्ये त्यांचा स्वभाव हा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी तयार झाला होता. अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा येथे एससी एसटी ओबीसींच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्यासाठी विलंब होत होता. ती स्कॉलरशिप त्वरित विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी बोर्डे साहेबांनी जिजामाता महाविद्यालयामध्ये मोठे आंदोलन केले होते. आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी या आंदोलनामुळे त्यांना बुलढाणा मध्ये सुद्धा तुरुंगवास भोगावा लागला.
दरम्यानच्या काळामध्ये त्यांना असं वाटलं की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी जळगाव खानदेश विभागातील खिरोदा या ठिकाणी बीएड साठी प्रवेश घेतला. बीएड यशस्वीपणे उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी पूर्व विदर्भातील पारशिवनी या ठिकाणी तीन वर्षे हायस्कूल शिक्षकाची नोकरी केली. पुढे जाऊन शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती देऊळगाव राजा येथील श्री शिवाजी हायस्कूल देऊळगाव राजा येथे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. या दरम्यान त्यांचा संपर्क बामसेफच्या कार्यकर्त्यांसोबत आला. बामसेफ या गैरराजनैतिक संघटने सोबत संपर्क आल्यामुळे पेटकर सर, झिने सर, वानखेडे सर, एडके सर,खंडागळे साहेब अशा नोकरीमध्ये असणाऱ्या हुशार लोकांचे त्यांनी कुशल पणे संघटन तयार केले. देऊळगाव राजा येथील बामसेफ संघटनेची मजबूती एवढी होती की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये देऊळगाव राजाची युनिट हे शक्तिशाली होते अशी त्याकाळी समजले जायचे. बामसेफ या संघटनेमध्ये सुद्धा त्यांनी खूप त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून कार्य केले. बामसेफ संघटने मध्ये त्यांचे वैशिष्ट्य असे की, एससी एसटी व ओबीसीच्या बांधवांना फुले आंबेडकरी विचारधारेकडे कशी आकर्षित करायचे हे कसब फक्त त्यांची एकट्यामध्येच होते. इतर कार्यकर्ते मात्र या बाबतीमध्ये एवढे यशस्वी झाले नाही. की जेवढे यशस्वी बोर्ड साहेबांनी काम केले.
साहेबांचा स्वभाव म्हणजे चॅलेंज स्वीकारणे. असा त्यांचा मूळ स्वभाव असल्यामुळे तेथील काही त्यांच्या सहकाऱ्यांनी हसता हसता त्यांना म्हटले की तुम्ही MPSC ही परीक्षा पास होऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी लगेच चॅलेंज स्वीकारून परीक्षेचा फॉर्म भरला आणि परीक्षेची तयारीला लागले. परीक्षेची जोरदार तयारी करून त्यांना परीक्षेमध्ये यश मिळाले व पुढे ते जिल्हा परिषद हायस्कूल बाळापुर येथे वर्ग 2 मुख्याध्यापक म्हणून नियुक्त झाले. मुख्याध्यापकाच्या खुर्चीवरून यशस्वी प्रशासन करून पुढे त्यांनी अनुक्रमे देऊळगाव राजा चिखली व बुलढाणा येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून मोठ्या कुशलतेने पद सांभाळले. सरळ, स्पष्ट व परखड स्वभाव असल्यामुळे चांगल्या चांगल्यांना त्यांनी सरळ केले. बोलण्यामध्ये वाकचातुर्य व हजरजबाबीपणा तसेच काम करणाऱ्या शिक्षकांचे ते खूप कौतुक करायचे. शिक्षकांकडून काम करून घेण्याचं त्यांचं वेगळंच कसब होते. नरमला नरम आणि कडकला तडक असं त्यांचं धोरण होतं.
अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्याच्या खुर्चीला न्याय दिल्यानंतर 2013 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी बामसेफ या संघटनेसाठी खूप मोठे कार्य केले. बामसेफ या संघटनेच्या विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीचे दात त्यांनी लगेच त्याच्या घशात घातले. बामसेफ विरोधी भूमिका ते कधी खपून घेत नसत. बामसेफ या संघटनेमुळे मला खरे फुले आंबेडकर आंदोलन समजले असे ते वारंवार सांगायचे. सामाजिक इतिहास या विषयावर आमची खूप चर्चा व्हायची. मला सुद्धा इतिहासाची खूप वेड असल्यामुळे बहुजन समाजातील महापुरुषांच्या इतिहासावर आमची तासंतास चर्चा चालायची. मी महार रेजिमेंटच्या लष्करी इतिहासावर डॉक्युमेंटरी बनवली होती त्यावेळेस त्यांना खूप आनंद झाला. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतावादी स्वराज्यासाठी लढणाऱ्या महार सैनिकांबद्दल व इतर बहुजन समाजातील मावळ्यांबद्दल ते खूप सखोल चर्चा करायचे. त्यांना नेहमी वाटायची घ्या खरा इतिहास बहुजन समाजापर्यंत गेला पाहिजे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा विशेष संपर्क होता. मराठा व ओबीसी समाजामध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या संघटनांची खूप मोठे कार्य आहे असे ते नेहमी म्हणायचे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या संघटनांनी केलेल्या समाज जागृतीमुळे आता बहुजन समाजातील दुरावलेली मने जुळत आहेत,एकत्र येत आहे अशी त्यांची भावना होती. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या नेतृत्वाने पावन झालेल्या या संघटनांकडे बोर्डे साहेब खूप आदराने बघायचे. एकेकाळी आपसांमध्ये लढणारे काही लोक आता आपल्या हक्क आणि अधिकारासाठी एकत्र येत आहे व सोबत आपल्या हक्कांसाठी चर्चा करत आहेत ही माझ्यासाठी खूप आनंदाची पर्वणी आहे असे ते नेहमी सांगायचे. दलित पॅंथर,बामसेफ या संघटनेनंतर मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या संघटनांचा बोर्डे साहेबांवर खूप मोठा प्रभाव होता. 12 जानेवारीला जिजाऊ दर्शनासाठी आणि अभिवादनासाठी आम्ही सिंदखेडा राजा येथे जायचो बऱ्याचदा बोर्डे साहेब आमच्या सोबत असायचे.
असं सगळं सुरळीत सुरू असताना अचानक 28 एप्रिलला सकाळी 6 वाजता अजय पडघान सर यांचा मला फोन आला. फोन सायलेंट असल्यामुळे तो उचलला गेला नाही. त्यानंतर दहा मिनिटांनी रमेश आराख सर यांचाही फोन आला. परंतु तोही फोन उचलला गेला नाही. मग थोड्या वेळाने मी फोन घेतला आणि बघितलं तर या दोघांचे अचानक कधी सकाळी न येणारे फोन सकाळी आल्यामुळे मी थोडासा बावरलो आणि आराख सरांना फोन लावला. त्यांनी लगेच सांगितले की बीओ साहेब गेले.. माझ्या पायाखालची जमीन हालली. काय करावे सुचत नव्हते. बुलढाण्यातील एक सामाजिक आधारस्तंभ खचून गेल्याची भावना मनामध्ये निर्माण झाली.
राजेश साळवे,बुलढाणा.
9405777887