भक्ती महामार्गाला तात्काळ स्थगिती द्या :- ॲड.जयश्री शेळके
मातृतीर्थ सिंदखेडराजा ते संतनगरी शेगाव यांना जोडणाऱ्या भक्ती महामार्गाबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. शेतकऱ्यांच्या भावनांचा सहानुभूतिपुर्वक विचार करुन भक्ती महामार्गाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव ॲड.जयश्री शेळके यांनी विरोधी पक्षनेते मा.विजयजी वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
याआधीच माजी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृध्दी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातून गेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने अधिग्रहित केल्या आहेत. आता आवश्यकता नसताना मातृतीर्थ सिंदखेडराजा ते संतनगरी शेगाव यांना जोडणारा भक्ती महामार्ग तयार करण्याचा घाट शासनाने घातला आहे. शेतमालाला न मिळणारा योग्य मोबदला, अनियमित पाऊस, वाढलेले खतांचे भाव, शासनाचे नेहमीचे शेतकरी विरोधी धोरण अशा अनेक संकटांची शेतकरी आधीच त्रस्त आहे. आता शेतजमिनी अधिग्रहीत होण्याची प्रचंड भिती शेतकऱ्यांचे दिसून येत आहे.
सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गासाठी मागील वर्षीच्या अर्थ संकल्पात घोषणा करण्यात आली होती. याबाबतची अधिसूचना शासनाच्यावतीने प्रसिध्द करण्यात आली आहे. सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव, शेगाव या पाच तालुक्यातील एकुण 43 गावांमधून हा भक्ती महामार्ग जात आहे. या परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहीत करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. प्रस्तावित भक्ती महामार्गामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भूमिहीन होणार आहे.
भक्ती महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांकडून टोकाचा विरोध होत असल्याने शासनाने हे शेतकरी विरोधी धोरण थांबवून तातडीने भक्ती महामार्गाला स्थगिती द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव ॲड.जयश्री शेळके यांनी विरोधी पक्षनेते मा.विजयजी वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.