साखरखेर्डा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या वडगाव माळी गावात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम दारुची अवैध विक्री सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून
वारंवार मागणी करुनही दारूबंदी होत नसल्याने आज 26 जूनला संतप्त झालेल्या गावातील महिलांनी अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी निवेदन देण्यात येऊन महिलांनी आपली कैफियत मांडली. त्यांना अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी देखील प्रतिसाद देत थेट दारूबंदी करण्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना फार्मान सोडले. मेहकर तालुक्यातील वडमाळी येथे गावठी व देशी दारू खुलेआम विकली जात आहे. या धंद्यांना गावात ऊत आला आहे. अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना त्रास होत आहे. तसेच विद्यार्थी व तरुणाई देखील दारुच्या व्यसनाला बळी पडत आहेत. या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून गावातील महिला अखेर पोलिसांकडे आल्या. ‘आमच्या येथील दारूविक्री बंद करा’ अशी मागणी यावेळी त्यांनी केली.गावात अवैध दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे गावामधील शांतता भंग होऊन गरीब व मध्यमवर्गीयांचे संसाराचा आर्थिक बजेट विस्कळीत होउन महिलांना कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण झाल्याची समस्या कथन केली. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी त्यांना धीर देत गावातील दारूबंदीसाठी तत्काळ साखरखेर्डा पोलिसांना कार्यवाहीसाठी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला.