लोकराजा शाहू महाराजांना पत्रकार बांधवांचे अभिवादन..
घटणेतील आरक्षणाची बीजे शाहू महाराजांनी रोवली – प्रा. लहाने
बुलडाणा
शिवाजी महाराजांनी सुरू केलेले रयतेचे राज्य लोककल्यानासाठी पुढे नेण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. शिवरायांच्या क्रांतिकारी वारश्या सोबतच सामाजिक क्षेत्रातही शाहू महाराजांनी मौलिक काम केले आहे. विधवा विवाहांची चळवळ आज जोर धरत असली तरी त्याचीही सुरुवात शाहू महाराजांच्या कार्यामध्ये दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाला सहकार्य करण्यात ते अग्रेसर राहिले. तर आपल्या संस्थांनामध्ये आरक्षणाचे बीज सर्वप्रथम त्यांनीच रोवले. पुढे हेच आरक्षण घटनेच्या चौकटीत स्थानबद्ध झाले आहे. त्यामुळे आरक्षणाची मुहूर्तमेढ राजश्री शाहू महाराजांनी रोवली असे म्हणता येईल, असे प्रतिपादन प्रा. डी एस लहाने यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त पत्रकार भवन बुलढाणा येथे पत्रकारांच्या वतीने राजर्षींना अभिवादन करण्यात आले. यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डी एस लहाने उपस्थित होते. तर साहित्यिक सुरेश साबळे, ज्येष्ठ पत्रकार संजय मोहिते,आयोजक गणेश निकम केळवडकर, लक्ष्मीकांत बगाडे, सोहम घाडगे ,जकिर शाहा,कैलाश रावूत,शौकत शहा, वसीम शेख ,शेख आसिफ,रहेमत आली,आदेश कांडेलकर, अभिषेक वरपे, संदीप वांत्रोले, आदींची उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.
पुढे बोलताना प्रा. लहाने म्हणाले-
राजर्षी शाहू महाराजांचे कार्य केवळ एखाद्या घटकापूरर्ती मर्यादित आहे असे म्हणतात येत नाही. त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वव्यापी काम केले. स्वतःची विधवा सून सती जात असताना त्यांनी तिला थांबवले. विधवा सुनेला त्यांनी शिक्षण दिले व तिला डॉक्टर करण्याचा त्यांचा मानस होता. ज्या वेळी स्त्रियांना शिक्षणाकडे फिरकू दिल्या जात नव्हते अशा काळामध्ये शाहू महाराजांनी स्वतःच्या सुनेला शिक्षण देऊन तिच्यासाठी ज्ञानाची दारे खुली केली. आपल्या विधवा सुनेसाठी अत्यंत ममत्वाची वागणूक त्यांनी दिल्याचे आपणास दिसते. विधवा पुनर्विवाह चळवळ आज दीडशे वर्षानंतर जोर धरत असली तरी राजर्षी शाहू महाराजांनी कृतीतून त्यावेळेस याही क्षेत्रामध्ये काम केले. राजश्री शाहू महाराजांसारखा सर्वव्यापी राजा हा सामाजिक प्रेरणा असल्याचे ते म्हणाले. सुरेश साबळे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी शाहू महाराजांनी मौलिक भूमिका घेतली. खामगाव येथे त्यांनी घेतलेली मराठा शिक्षण परिषद ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारी ठरल्याचे साबळे म्हणाले. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये त्या काळी ज्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या त्याच्या पाठीमागे राजर्षी शाहू महाराजांची प्रेरणा होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली. या संस्थेमध्ये बहुजन समाजाची मुले शिकून पुढे आली त्या पाठीमागे ही राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आपणास दिसते. कर्मवीर भाऊराव पाटील हे शाहू महाराजांच्या शाळेचे विद्यार्थी होते,असे ते म्हणाले. महिला ंच्या उन्नतीसाठी अनेक कायदे त्यांनी केले असे सांगून राजश्री शाहू महाराजांनी लागू केलेल्या आरक्षणावर त्यांनी भाष्य केले. पत्रकार गणेश निकम यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला. शिका संघटित व्हा असे आपण म्हणतो. बाबासाहेबांनी हाच मूलमंत्र दिला परंतु सक्तीचे शिक्षण देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज त्या काळामध्ये किती आग्रही होते याचे उदाहरण देऊन निकम यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे बहारदार संचलन पत्रकार अभिषेक वरर्पे यांनी केले. तर आभार प्रदर्शन पत्रकार सोहम घाडगे यांनी मानले.