खा.प्रतापराव जाधव यांची केंद्र सरकारच्या गुंतवणूक वाढीवरील कॅबिनेट समितीवर निवड
बुलडाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ समित्यांची पुनर्रचना बुधवारी ३ जुलैला केली. आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना विशेष निमंत्रित म्हणून गुंतवणूक आणि वाढीवरील कॅबिनेट मंत्रिमंडळ समितीवर नियुक्त केले आहे.
ही समिती निर्धारित कालमर्यादेत जलद अंमलबजावणी आणि आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची ओळख करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ही मंत्रिमंडळ समिती देशातील सर्व क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीवर देखरेख करते, त्यांची जलद प्रगती सुनिश्चित करते. ही समिती केंद्रीय स्तरावर सरकारी धोरणे तयार करण्यासाठी प्राथमिक संस्था म्हणून काम करत असते.
राष्ट्रीय विकास उपक्रमांना पुढे नेण्यासाठी ही समिती प्रभावीपणे समन्वय साधण्याचे काम करते. देशाच्या आर्थिक विकासात भरीव काम करणाऱ्या गुंतवणूक, वाढीवरील कॅबिनेट समितीमध्ये प्रतापराव जाधव यांचा समावेश केल्याने देशाच्या आर्थिक विकासात विकासाच्या अजेंड्यामध्ये योगदान देण्याची त्यांची भूमिका राहणार आहे. केंद्र सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्री झालेले खासदार प्रतापराव जाधव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेली जवळीक बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाला पूरक ठरणारी आहे.