पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी द्या
* सुषमाताई अंधारे यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण
* ॲड.जयश्री शेळके यांचा उपोषणाला पाठिंबा
बुलडाणा
पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी देण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसल्या आहेत. या उपोषणाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲड.जयश्री शेळके यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
सध्या राज्यात सुरु असलेली १७४३१ पदांसाठीची पोलीस भरती प्रक्रिया ही २०२२-२३ या वर्षातील आहे. या पोलिस भरतीची जाहिरात ३१ डिसेंबरपूर्वी निघणे अपेक्षित असताना, ही जाहिरात फेब्रुवारीत काढण्यात आली. या तीन महिन्यात अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली. या भरती प्रक्रियेसाठी २०२१-२२ नुसार वय गणना होणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. परिणामी लाखो तरुण या भरतीपासून वंचित राहिले आहेत. लाखो तरुण पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जाहिरातीची वाट बघत असतात. परंतु शासनाने वेळेत जाहिरात न काढल्याने तरुणांच्या पदरी निराशा आली आहे.
त्यामुळे या २०२२-२३ च्या भरती प्रक्रियेसाठी २०२१-२२ नुसार वय गणना करावी किंवा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना एक संधी द्यावी, अशी मागणी घेऊन अनेक विद्यार्थी आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. परंतु आता पर्यंत राज्य शासनाने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे कालपासून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या या उपोषणाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव ॲड.जयश्री शेळके यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.